Hardik Pandya : हार्दिक पांड्याने सोडली मुंबई; करिअरसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार आणि मॅचविनर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्ती अबाधित राखण्यासाठी एक अतिशय मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे.

Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार आणि मॅचविनर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्ती अबाधित राखण्यासाठी एक अतिशय मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही मोठ्या आणि प्रस्थापित क्रिकेटपटूने न घेतलेला निर्णय घेत हार्दिकने (Hardik Pandya) आपला कायमस्वरूपी ‘ट्रेनिंग बेस’ थेट बंगळुरू येथे हलवला आहे.
यापुढे जेव्हा जेव्हा हार्दिकवर भारतीय संघ, आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटच्या सामन्यांची जबाबदारी नसेल, तेव्हा त्याचे मुख्य ठिकाण मुंबई ऐवजी बंगळुरू येथील बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हेच असणार आहे.
हार्दिकचा (Hardik Pandya) हा निर्णय केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यापुरता मर्यादित नसून, सततच्या दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या या अष्टपैलू खेळाडूच्या संपूर्ण क्रिकेट रणनीतीमधील एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.
गेल्या काही वर्षांमधील हार्दिक पंड्याचा आलेख पाहिला, तर तो जितका आपल्या स्फोटक फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीमुळे जगभरात चर्चेत राहिला, तितकाच तो वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहिल्यानेही चर्चेत आला. कधी पाठीचा गंभीर त्रास, कधी घोट्याची दुखापत, तर आता नुकतीच झालेली क्वाड्रिसेप्सची (मांडीच्या स्नायूंची) दुखापत, यामुळे त्याला अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मालिका आणि मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले आहे.
दुखापतींच्या या सत्रामुळे त्याच्या एकूणच उपलब्धतेवर आणि कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते. याच पार्श्वभूमीवर, आपली उर्वरित क्रिकेट कारकीर्द केवळ आणि केवळ तंदुरुस्तीला (Fitness) केंद्रस्थानी ठेवून आखण्याचा आणि मैदानावर दीर्घकाळ टिकून राहण्याचा ठोस निर्णय त्याने घेतला आहे.
हार्दिक पंड्या हा मूळचा बडोद्याचा असला, तरी गेल्या अनेक वर्षांपासून तो आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाला होता. मुंबईत असताना तो ‘मुंबई इंडियन्स’च्या हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये नियमित सराव करत असे.
मात्र, बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गजबजलेल्या लोअर परळ भागातील आपल्या घरातून रोज सरावासाठी प्रवास करणे हार्दिकसाठी अत्यंत थकवणारं आणि त्रासदायक ठरत होते. मुंबईतील ट्रॅफिक आणि प्रवासाचा ताण त्याच्या शारीरिक रिकव्हरीमध्ये अडथळा ठरत होता.
दुसरीकडे, बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये जागतिक दर्जाच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा, दुखापतीतून सावरण्यासाठी आवश्यक असणारी सर्वोत्तम रिकव्हरी सिस्टीम, फिटनेस आणि कौशल्य विकासाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
हाच विचार करून हार्दिकने (Hardik Pandya) आता बंगळुरूच्या बाहेरील भागात, म्हणजेच या सेंटरच्या अगदी जवळ एक घर भाड्याने घेतले आहे. आता हेच नवीन घर त्याचे मुख्य ठिकाण बनले असून, तिथूनच तो आपल्या फिटनेसवर आणि सरावावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. आपल्या खेळाप्रती असलेली निष्ठा आणि पुनरागमन करण्याची जिद्द या निर्णयाच्या माध्यमातून हार्दिकने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.






