Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे फॅन आयोजकांसाठी ठरले डोकेदुखी! अचानक बदलावे लागले सामन्याचे ठिकाण

सुरक्षा चिंतेमुळे मैदान बदलले –
हार्दिक पंड्या टीम इंडियात परतण्यापूर्वी आपली फिटनेस तपासण्यासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये काही सामने खेळत आहे. बडोदा संघाला आपला पुढील सामना ४ डिसेंबर रोजी हैदराबादमधील जिमखाना ग्राउंडवर गुजरातविरुद्ध खेळायचा होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी जिमखाना ग्राउंडवर पाहायला मिळत होती. अगदी सरावाच्या वेळीही मोठ्या संख्येने चाहते तिथे जमा होत होते.
या वाढत्या गर्दीमुळे आणि सुरक्षा व्यवस्थेच्या चिंतेमुळे आयोजकांनी एक मोठा निर्णय घेतला. वृत्तसंस्था ‘पीटीआय’च्या अहवालानुसार, बडोदा आणि गुजरात यांच्यातील हा सामना जिमखाना ग्राउंडवरून हलवून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या स्टेडियममध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येते, यासाठी हा बदल करण्यात आला.
हेही वाचा – Joe Root Century : …तर हेडनला नग्न धावावं लागलं असतं! रुटच्या शतकाने वाचवली लाज
गुजरातविरुद्ध झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या या सामन्यात बडोदा संघाने गुजरातवर सहज विजय मिळवला. बडोदाच्या गोलंदाजांनी गुजरातच्या संघाला अवघ्या १४.१ षटकांत केवळ ७३ धावांवर गुंडाळले. बडोदा संघाने हे लक्ष्य केवळ ६.४ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १ विकेट घेतली आणि फलंदाजी करताना १० धावांचे योगदान दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिळालेल्या या यशामुळे हार्दिक पंड्या टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येते.





