MI vs GT : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर मोठा दणका! हार्दिक पंड्यासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

Hardik Pandya and Ashish Nehra Fined in MI vs GT match : आयपीएल २०२५ मधील ५६ वा सामना मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा ३ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्याला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचा स्लो ओव्हररेटचा हा दुसरा गुन्हा होता, त्यामुळे पंड्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हार्दिक पंड्यासह एमआय संघाला दंड –
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इम्पॅक्ट प्लेअर आणि कन्कशन सब्स्टिट्यूटसह उर्वरित प्लेइंग इलेव्हनमधील सर्व सदस्यांना वैयक्तिकरित्या ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराला कलम २.२० चे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले, जे खेळाच्या भावनेविरुद्ध वर्तनाशी संबंधित आहे. त्याला त्याच्या शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला.
Hardik Pandya was fined ₹24 lakh, while his teammates, including the impact player and concussion substitute, were fined ₹6 lakh or 25% of their match fee, and GT coach Ashish Nehra received a financial penalty and demerit point for unsporting behavior.#IPL2025 #HardikPandya pic.twitter.com/lRP7hYEyOx
— CricTracker (@Cricketracker) May 7, 2025
आशिष नेहरालाही दंड –
“आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराला त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे,” असे एका निवेदनात म्हटले आहे. त्याने कलम २.२० अंतर्गत लेव्हल १ च्या गुन्ह्याशी संबंधीत अपराध मान्य केला आहे.
हेही वाचा – IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरचा IPL वेळापत्रकावर परिणाम, फ्रँचायझी चिंतेत, काय आहे कारण?
निवेदनामध्ये आशिष नेहराच्या चुकीचा उल्लेख नव्हता पण पावसामुळे वारंवार थांबलेल्या सामन्यादरम्यान तो आपला संयम गमावताना दिसला. तो मैदानावरील पंचांशीही वारंवार बोलत होता. पंचांना हे अजिबात आवडले नाही. लेव्हल १ च्या आचारसंहिता उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, कलम २.२० सर्व प्रकारच्या आचारसंहितांना व्यापते.





