Hardik Pandya Birthday : “वयाच्या १९ वर्षांपर्यंत फक्त फलंदाज होता हार्दिक, मग एका मॅचने बदलले नशीब”, वाढदिवशी गर्लफ्रेंडची हृदयस्पर्शी पोस्ट
Hardik Pandya Birthday : स्टार भारतीय अष्टपैलू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने, त्याची गर्लफ्रेंड महिका शर्माने सोशल मीडियावर त्याच्या प्रवासाविषयी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

Hardik Pandya 33rd Birthday Mahieka Sharma Emotional Post Struggle Story : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३३ क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या हार्दिकसाठी हा वाढदिवस अत्यंत खास ठरला आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून भारताच्या अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या हार्दिकच्या या वाढदिवसानिमित्त त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माने (Mahika Sharma) सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. गरिबी आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून हार्दिकने यशाची शिखरे कशी गाठली, या संघर्षाच्या आठवणी तिने जागवल्या आहेत.
१९ व्या वर्षापर्यंत फक्त फलंदाज; खोडकर भावाची अशी सुरू झाली कहाणी!
माहिकाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये खुलासा केला की, हार्दिक वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत बडोद्यात प्रामुख्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज होता. प्रचंड ऊर्जा आणि चपळता असलेल्या हार्दिकसाठी क्रिकेट हे स्वतःला सिद्ध करण्याचे माध्यम बनले होते. जास्त शिक्षण झालेले नसतानाही त्याने क्रिकेटच्या मैदानालाच आपली खरी भाषा बनवले आणि जीवनाची नवी दिशा शोधली.
मित्रांच्या सरावासाठी गोलंदाजी अन् कोचची पडली नजर!
View this post on Instagram
आपली फलंदाजी संपल्यानंतरही हार्दिक मैदानावर थांबून सहकारी गोलंदाजांना फलंदाजीचा सराव मिळावा म्हणून नेट्समध्ये गोलंदाजी करायचा. एके दिवशी एका वरिष्ठ प्रशिक्षकाची नजर त्याच्या अचूक गोलंदाजीवर पडली. केवळ फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिकची गोलंदाजी पाहून ते प्रशिक्षक अवाक झाले आणि त्यांनी त्याला गोलंदाजीतही नशीब आजमावण्याचा सल्ला दिला.
गोलंदाजीसाठी बूट नव्हते, पण पहिल्याच सामन्यात घेतल्या ५ विकेट्स!
काही दिवसांनंतर हार्दिकने अष्टपैलू म्हणून पहिला सामना खेळला, जिथे त्याच्याकडे गोलंदाजी करण्यासाठी साधे बूटही नव्हते. तरीही त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स टिपत खळबळ उडवून दिली. यानंतर दोन वर्षांतच त्याला त्याच्या आवडत्या आयपीएल संघाने वेगवान अष्टपैलू म्हणून करारबद्ध केले आणि अवघ्या सहा महिन्यांत त्याने थेट भारतीय संघात पदार्पण केले.





