Harbhajan Singh react on Rohit Sharma ODI Captaincy : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे आणि टी-20 संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवून शुबमन गिलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी गिलला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे. सात महिन्यांनंतर हे दोघे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर एकत्र दिसणार आहेत. शुबमन गिलला कर्णधारपद मिळाल्याने क्रिकेट विश्वात उत्साह आणि नाराजी असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. हरभजन सिंगने जिओ हॉटस्टारवर बोलताना शुबमन गिलला कर्णधारपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. “गिलने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता त्याच्यावर वनडेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, याबद्दल त्याचे कौतुक,” असे हरभजन म्हणाला. रोहितला आणखी संधी मिळायला हवी होती – मात्र, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे त्याने नमूद केले. हरभजन सिंग म्हणाला, “रोहित शर्माचा व्हाईट बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तो संघात असताना त्याला कर्णधारपदावरून हटवणे आश्चर्यकारक आहे.”. तो पुढे म्हणाला, “रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, तर तो कर्णधार म्हणूनच जायला हवा होता. त्याने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आणखी संधी मिळेल, अशी मला अपेक्षा होती.” हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅननं स्वत:हून वनडेचं कर्णधारपद सोडलं की हटवलं? अजित आगरकरने दिलं स्पष्टीकरण गिलसाठी आनंदी, पण रोहितसाठी नाराज – 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाला अजून वेळ असल्याने गिलला कर्णधारपदासाठी थोडा काळ वाट पाहता आली असती, असेही हरभजनने सुचवले. “2027 च्या विश्वचषकाचा विचार करता, गिलकडे अजून पुरेसा वेळ आहे. त्याने कदाचित 6-7 महिने किंवा एक वर्षानंतर ही जबाबदारी स्वीकारली असती. गिलसाठी मी आनंदी आहे, पण रोहित शर्मा कर्णधार नसल्याने थोडी निराशा वाटते,” अशी संमिश्र प्रतिक्रिया हरभजन सिंगने व्यक्त केली.