Satara | कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचार्यांची दिवाळी गोड

कोरेगाव, (प्रतिनिधी)- कोरेगाव नगरपंचायतीने अवघ्या २२ दिवसांत २२ लाख रुपयांची करवसुली करुन कर्मचार्यांना तीन महिन्यांचा थकीत पगार अदा केला आहे. एकूणच नगरपंचायतीने आता कात टाकायला सुरुवात केलेली असून कर्मचार्यांची दिवाळी आता गोड होणार आहे.
कोरेगाव नगरपंचायतीत नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी नगराध्यक्षा सौ. दीपाली महेश बर्गे व नवनियुक्त मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी नियोजन केले असून मिळकतकर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
या नगरपंचायतीकडे राज्यातील सर्वांधिक कर्मचारी असलेली नगरपंचायत म्हणून पाहिले जाते. पूर्वी ग्रामपंचायत असताना जकात कर अनुदानातून कारभार चालत होता, कालांतराने नगरपंचायत झाल्याने राज्य सरकारने हे अनुदान बंद केले. त्यामुळे कारभारावर मर्यादा आल्या.
नगरपंचायतीचे स्वत:चे असे कोणतेही उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने केवळ राज्य सरकारच्या योजनांवर अवलंबून विकासकामे करावी लागत होती.
दैनंदिन खर्च, दिवाबत्ती, पाणीपुरवठा यांसह प्रशासकीय खर्च करण्यासाठी मिळकतकर वसुली हाच मोठा कणा होता. मात्र, करोना काळापासून करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. कागदोपत्री कारवाई करण्यापलिकडे प्रशासन काहीच करु शकत नव्हते.
राहुल रघुनाथ बर्गे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपंचायतीच्या आर्थिक कारभारावर लक्ष केंद्रीत केले. कोरेगाव विकास आघाडीसह विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रशासकीय खर्चात कपात केली.
मिळकतकर वसुलीवर भर दिला. आगामी दोन ते तीन महिन्यात प्रस्तावित खर्च लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करण्यात आले.
कर्मचार्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तीन महिन्यांचे पगार टप्याटप्प्याने करण्यात आले. नगरपंचायतीची आर्थिक घडी आता व्यवस्थित होण्याच्या मार्गावर असल्याने कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे.
आपलेच शहर असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे : राहूल बर्गे
कोरेगाव आपलेच शहर आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीपासून सहकार्य केल्याने शहराचा विकास होऊ शकला आहे. नगरपंचायत झाल्यापासून शहराची आणि शहरवासियांची जबाबदारी वाढली आहे.
नगरपंचायतीचा आर्थिक कणा हा केवळ मिळकतकर वसुलीच आहे, त्यामुळे नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांसह उद्योजकांनी आपल्याकडील थकबाकी लवकरात लवकर भरुन सहकार्य करावे, असे आवाहन राहुल रघुनाथ बर्गे यांनी केले आहे.


