Satara : कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचार्यांना आता किमान वेतन

कोरेगाव : आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावच्या कायापालटाचा निर्धार करणारे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी नगरपंचायतीच्या कर्मचार्यांचा हितालाही प्राधान्य दिले आहे. गेली सात वर्षे अल्प वेतनावर काम करणार्या कर्मचार्यांना त्यांनी किमान वेतनाचा लाभ मिळवून दिला आहे. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या कर्मचार्यांनी बुधवारी राहुल बर्गे व मुख्याधिकारी विनोद जळक यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष बर्गे उपस्थित होते.
उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल बर्गे यांनी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, त्यांनी मिळकतकर वसुली गतिमान केली आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांनी दैनंदिन कामकाजात सुधारणा घडवून, शिस्त आणली आहे.
नगरपंचायतीचे कर्मचारी किमान वेतनापासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपनगराध्यक्ष बर्गे यांनी नगराध्यक्ष दीपाली बर्गे व मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी चर्चा केली. कर्मचार्यांना किमान वेतनाचा लाभ देण्यात असलेल्या अडचणी दूर करून, त्याची अंमलबजावणी केली आहे.
आम्ही गेली सात वर्षे किमान वेतनापासून वंचित होतो. रोजंदारीवर काम करत होतो. आम्हाला भविष्याची चिंता होती. आमचे कुटुंबीय दडपणाखाली होते. मात्र, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी दखल घेऊन, आम्हाला किमान वेतनाचा लाभ तातडीने दिला. त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असे सांगत कर्मचार्यांनी बर्गे यांचा सत्कार केला.
कोरेगावचा विकास हाच ध्यास
आमदार महेश शिंदे यांना कोरेगाव हे पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श शहर बनवायचे आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आहे. कर्मचार्यांना प्रोत्साहन, त्यांना किमान वेतनाचा लाभ देणे आणि त्यांच्या अडीअडचणींमध्ये मदत करणे, ही भूमिका घेतल्याने नगरपंचायतीच्या कामकाजात मोठी सुधारणा झाली आहे. आगामी काळात लोकप्रतिनिधी, प्रशासन, कर्मचारी आणि नागरिकांच्या संवादातून शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राहुल रघुनाथ बर्गे यांनी व्यक्त केला.





