Hanumant Pawar : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण
Hanumant Pawar : पुणे पोलिसांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण (गनमॅन) दिले आहे

Hanumant Pawar : काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे पोलिसांकडून पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. स्वारगेट परिसरात एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर संरक्षण
२३ फेब्रुवारी रोजी हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडे आणि त्याच्या साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती.
घटनेनंतर हनुमंत पवार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर तुषार दामगुडे यांच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हनुमंत पवार यांना एक गनमॅन पोलीस कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पवार यांची प्रतिक्रिया
मारहाणीबाबत प्रतिक्रिया देताना हनुमंत पवार म्हणाले की, “मी काँग्रेसच्या विचारांचा पाईक आहे. प्रतिकार केला, पण हिंसा केली नाही. मी शेतीमधला माणूस आहे. बैलाला कोपराने बुक्की देऊन खाली बसवायचो. दामगुडेला एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठू शकला नसता.” ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
काँग्रेस नेत्यांची भेट
काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पुण्यातील काँग्रेस भवन येथे हनुमंत पवार यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करत कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, तुषार दामगुडे यांनी आपल्या कृतीबाबत कोणतीही खंत नसल्याचे सांगितले असून, “जे केलं ते योग्यच केलं,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


