संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या; पुण्यात सर्वपक्षीय मोर्चातील नागरिकांचा ‘आक्रोश’

पुणे – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी एकमुखी मागणी पुण्यातील सर्वपक्षीय मोर्चात करणयात आली. लालमहाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. सोमवार पेठमार्गे हा मोर्चा पुणे स्टेशन येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथे जाहीर सभा झाली.
मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबिय, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, संभाजी बिग्रेडचे विकास पासलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ज्योती मेटे, उपस्थित होते.
यावेळी आरोपींना मदत करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. विविध वक्त्यांनी बीड जिल्ह्यात काही कुटुंबीयांनी सुरू केलेल्या दादागिरीवर टीका केली. बीड जिल्ह्यात एवढी दादागिरी वाढली आहे, की नागरिकांना दादागिरीच्या भीतीने जिल्ह्यातून पलायन करावे लागत आहे.
यावेळी आमदार धस म्हणाले की, बीडमधील कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. अशा वेळी माझ्यावर काहीही टीका करा, ती सहन करण्याची माझी तयारी आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी काही लोक सोडले तरी चालू शकते. मात्र, महाराष्ट्राचा बिहार होऊ नये, यासाठी मंत्री धनंजय मुंडेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर ठेवा, अशी मागणी धस यांनी केली.
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, एसआयटीच्या तपासाबाबत शंका निर्माण होत आहे. कारण एसआयटीमध्ये “वालू काकाचे चालू बाबा’ही काम करीत आहे. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास होणे गरजेचे आहे. “गँग ऑफ परळी’ म्हणून ओळख असणाऱ्या आका आणि वालूकाकाच्या पुण्यात अनेक सदनिका आहेत. त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धस यांनी केली.





