यशश्री, अक्षता यांच्या आरोपींना फाशी द्या! सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांनी काढला आक्रोश मोर्चा

पनवेल : उरणमधील यशश्री शिंदे आणि नवी मुंबई बेलापूरमधील अक्षता म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सोमवारी (29 जुलै) पनवेलमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘नको आम्हाला दीड हजार, महिलांना द्या सुरक्षेचा आधार’ अशा घोषणा करत महिलांनी सुरक्षेसाठी कडक कायद्याची मागणी केली. या मोर्चात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी तर पनवेलकर सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही घटनांमधील आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.
भर पावसात हा आक्रोश मोर्चा पनवेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. उरणमधील यशश्री शिंदे या युवतीची तीन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. तत्पूर्वी दोन आठवड्यांपूर्वी बेलापूरमधील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या अत्याचार आणि हत्येने नवी मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. याचा निषेध करण्यासाठी पनवेल परिसरातील विविध राजकीय पक्ष, महिला आघाडी एकत्र आले होते.
पोस्टमार्टम अहवालात खुलासा
उरणमधील यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था झाली होती. याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुणा आढळून आल्या होत्या. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे यांच्या प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही. यशश्री शिंदे हिचा चाकुने खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. आरोपींनी यशश्री शिंदे यांच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार केले होते, ही बाबदेखील स्पष्ट झाली आहे.





