Baramati : पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने हंडा मोर्चा रद्द
Baramati : कानाडवाडी व पांढरवस्ती येथील नागरिकांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत चोपडज हद्दीतील कानाडवाडी व पांढरवस्ती येथील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर पंचायत समिती प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. बहुजन समाज पार्टीचे बारामती विधानसभा अध्यक्ष दयानंद मोतीराम पिसाळ यांनी नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी मंगळवार, दि. २७ रोजी नियोजित हंडा मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पंचायत समिती सभापती किरण तावरे यांच्या पुढाकाराने तसेच जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम (ढोले) यांनी पिसाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणीटंचाईची माहिती घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.
कानाडवाडी व पांढरवस्ती येथील नागरिकांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दयानंद पिसाळ यांनी पंचायत समिती,बारामती येथे लेखी निवेदन देऊन नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. पाणीप्रश्न न सुटल्यास हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या प्रश्नाची दखल घेत पंचायत समिती सभापती किरण तावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पंचायत समिती गटनेते रावसाहेब चोरमारे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार,प्रशासकीय अधिकारी सचिन धापटे आणि ग्रामसेविका दिपाली लडकत यांच्या सहभागातून पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान,जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम (ढोले) यांनीही दयानंद पिसाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कानाडवाडी व पांढरवस्ती येथील पाणीटंचाईची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेल्या अडचणी जाणून घेत त्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले.
पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी पत्रात कानाडवाडी व पांढरवस्ती येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आवश्यक उपाययोजना करणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असून,विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच पांढरवस्ती येथे हातपंप बसविण्याच्या मागणीसंदर्भात भूजल विभागाकडून सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कानाडवाडी व पांढरवस्तीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरे,जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम(ढोले)आणि पंचायत समिती प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. लेखी आश्वासन मिळाल्याने हंडा मोर्चा तूर्तास स्थगित केला आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू होईल.असा विश्वास आहे.
-दयानंद पिसाळ, अध्यक्ष, बारामती विधानसभा,बसपा





