मढमधील अनधिकृत स्टुडिओवर हातोडा; किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलल्या मढ परिसरातील अनधिकृत स्टुडिओवर कारवाई केली जात आहे. याप्रकरणी १००० कोटींचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी दिला होता. त्यानुसार ही कारवाई केली जात आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी या स्टुडिओबाबत काँग्रेसचे माजी मंत्री असलम शेख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असून हे पाहण्यासाठी किरीट सोमय्या हातात प्रतीकात्मक हातोडा, कुऱ्हाड घेऊन मढमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत. २०२१ मध्ये असलम शेख यांनी मढ मार्वे परिसरात अनधिकृत स्टुडिओ बांधण्यास परवानगी दिल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले होते. याची दखल घेतल्यानंतर या कारवाईला सुरूवात झाली आहे.
यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, ‘असलम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेने २०२१ साली डझनभर अनधिकृत स्टुडिओ मढमध्ये उभारण्यात आले. 25 आणि 50 हजार स्केवेअर फूटच्या स्टुडिओंना आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेने ‘आओ जाओ राज तुम्हारा’ फक्त ‘मातोश्री’वर हिशोब द्या आणि जे करायचे ते करा असं चालवलं होतं.’
‘आजपासून स्टुडिओ पाडण्याचं काम सुरु होणार असून, ‘मोदी है तो मुमकीन है’. आदित्य ठाकरे आणि असलम शेख या दोघांनी मिळून स्टुडिओला परवानगी दिली होती. त्यामुळे असलम शेख काँग्रेसचा हात आणि वांद्र्याची नोट मोजण्याची मशीन आहे.’ अशी टीका किरीट सोमय्यांनी केली.




