हमास- इस्रायल युद्धामुळे सागरी सुरक्षा धोक्यात; अमेरिका चिंतेत

वॉशिंग्टन – हमास आणि इस्रायल दरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठी यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ॲन्टनी ब्लिंकेन आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात आज चर्चा झाली. हे युद्ध थांबवण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करायला हवेत, याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
इस्रायलला मदत केल्यामुळे हौती बंडखोरांनी लाल समुद्रामध्ये व्यवसायिक जहाजांना लक्ष्य करण्याबाबत ब्लिंकेन यांनी चिंता व्यक्त केली. हौती बंडखोरांच्या या हल्ल्यांमुळे सागरी असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसेच सर्व देशांनी पालन करण्याचे मान्य केलेल्या आंतरखंडीय कायद्यांचेही उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी युद्धविराम लवकरात लवकर लागू होण्याच्या मुद्यावर भर दिला. “प्रमुख देशांनी निष्पक्षता आणि न्यायाचे पालन केले पाहिजे, वस्तुनिष्ठता आणि निःपक्षपातीपणा राखला पाहिजे, शांतता आणि तर्कशुद्धता दाखवली पाहिजे आणि परिस्थिती शांत करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात मानवतावादी आपत्ती टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत,” असे वँग म्हणाले.
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेला अनुसरून दोन्ही देशांमधील संवाद वाढवण्यावरही यावेळी भर देण्यात आला.



