कैरो – गाझामध्ये युद्धबंदीबाबत इस्रायलने दिलेला प्रस्ताव हमासने स्वीकारला आहे. हा प्रस्ताव इस्रायलच्यावतीने इजिप्त आणि कतार या मध्यस्थांनी हमास समोर मांडला होता. लागू असलेली युद्धबंदी इस्रायलने मोडून अचानक गाझामध्ये पुन्हा हल्ल्यांना सुरुवात केली होती. त्यामुळे अडचणीत आलेल्या युद्धबंदीला पुन्हा लागू करण्यासाठी इजिप्तने या आठवड्याच्या सुरुवातीला युद्धबंदीचा नवीन प्रस्ताव हमाससमोर ठेवला होता. मात्र इस्रायलने अमेरिका या तिसऱ्या मध्यस्थाच्या माध्यमातून हमाससमोर आणखी एक प्रस्ताव देखील ठेवला आहे. गाझामधील हमासचा नेता खलिल अल-हयाह याने इस्रायलचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे म्हटले आहे. मात्र हमासने यापैकी कोणता प्रस्ताव स्वीकारला आहे, हे नक्की समजू शकलेले नाही. इजिप्तने मांडलेल्या प्रस्तावामध्ये हमासने अमेरिकन-इस्रायली नागरिकासह ५ इस्रायली ओलिसांची सुटका करावी. त्याबदल्यात इस्रायलने गाझामध्ये मदत उपलब्ध होऊ द्यावी. आठवड्याभराचा युद्धविरामादरम्यान इस्रायलच्या तुरुंगातील शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात यावी, असेही इजिप्तने सुचवले होते, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. इस्रायलने नवीन कोणता प्रस्ताव दिला होता, याबाबत पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाकडून कोणताही तपशील देण्यात आला नाही. नेतान्याहू यांनी शुक्रवारी केलेल्या चर्चेनंतर हा सुधारीत प्रस्ताव हमासला देण्यात आला आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्ट्यातल्या इजिप्तच्या सीमेजवळच्या रफाह शहराजवळ नव्याने पायदळाची कारवाई सुरू केली आहे. मात्र पायदळाची कारवाई कोठे केली जाणार आहे, हे स्पष्ट केले गेलेले नाही. उर्वरित ओलिसांची सुटका अनिश्चित… हमास जोपर्यंत उर्वरित ५९ ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत युद्ध सुरू ठेवले जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांपैकी २४ जण अजूनही जिवंत असल्याचे मानले जाते आहे. हमासने गाझामधील सत्ता, शस्त्रे सोडून द्यावीत आणि नेत्यांना हाकलून द्यावे, असेही इस्रायलने म्हटले आहे. तर जोपर्यंत स्थायी युद्धबंदी जाहीर केली जात नाही, तोपर्यंत उर्वरित ओलिसांची सुटका केली जाणार नाही, असे हमासने म्हटले आहे. उर्वरित ओलिसांची सुटका कधी होणार हे समजू न शकल्यामुळे या ओलिसांच्या नातेवाईकांनी शनिवारी पुन्हा जोरदार निदर्शने करून तोडगा लवकर काढण्याची मागणी केली.