पुणे | अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पर्वती जलकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे जवळपास अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी विस्कळीत झाला. पर्वती जलकेंद्र बंदच राहिल्याने त्याचा फटका लष्कर तसेच चतृ:शृंगी पाणीपुरवठा विभागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
सकाळी दहा वाजता हा बिघाड झाल्यानंतर तो दोन तासांत दुरूस्त होईल, अशी प्रशासनास अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू होण्यास सायंकाळी चार वाजले.
त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला असून महापालिकेकडून दुपारनंतर वेळापत्रकात बदल करत सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत पाणी बंद असलेल्या भागात सायंकाळी पाणी सोडले. तर, रात्री उशिरापर्यंत सर्व विस्कळीत भागांना पाणीपुरवठाकरण्यात आला आहे
पर्वती जलकेंद्राच्या जुन्या आणि नव्या केंद्राची क्षमता ६१० एमएलडी असून लष्कर जलकेंद्रातून सुमारे दीडशे एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पर्वती जलकेंद्रच पूर्णच बंद पडल्याने शहरातील सर्व मध्यवर्ती पेठा, शिवदर्शन, अरण्येश्वर वसाहत, शिंदे हायस्कूलसमोरील भाग,
सहकारनगर, तावरे कॉलनी, वाळवेकरनगर, गंगाधर मिठाईवाला परिसर, नवमहाराष्ट्र सोसायटी, कोंढवा, औंध, पाषाण, शिवाजीनगर, डेक्कन, कात्रजचा काही भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला तर लष्कर जलकेंद्र बंद पडल्याने हडपसर, मुंढवा, खराडी, कोंढवा, वानवडी, पुणे स्टेशन भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.





