Pimpri : पिंपळे सौदागर येथे अर्धमॅरेथॉन उत्साहात

पिंपरी : यशदा पिंपरी-चिंचवड अर्धमॅरेथॉन (पीसीएचएम) स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. अतिशय थंडीच्या वातावरणात पहाटे साडेपाच वाजल्यापासून मॅरेथॉन स्पर्धेत वेगवेगळ्या शर्यतींना सुरुवात झाली होती. या स्पर्धेत अडीच हजारांपेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. सर्व गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम पारितोषिक स्वरूपात प्रदान करण्यात आले.
यशदा रिअल्टी ग्रुप, शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि किशान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. २१ किमी अंतराची अर्ध मॅरेथॉन सकाळी ५.३० वाजता सुरू झाली. त्यानंतर अनुक्रमे १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यती पार पडल्या. या शर्यतीत साड्या परिधान करून महिलांनीही सहभाग नोंदवला. तसेच अंध विद्यार्थीही शर्यतीत धावले. तत्पूर्वी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, यशदाचे अध्यक्ष वसंत काटे आदी मान्यवरांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
यावेळी भाजप शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, उद्योजक संजय भिसे, विजय काटे, सुर्यकांत जाधव, रोहिदास गवारी आदी उपस्थित होते. पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन सोसायटीच्या आवारातील मोकळ्या मैदानातून शर्यतींना सुरुवात झाली. कुंजीर चौक-शिवार चौक-रक्षक चौक येथून तर परतीचा प्रवास पीके चौक-कोकणे चौक-कासारवाडी, नाशिक फाटा ते प्रारंभाचे स्थळ असा होता.
यशदा पिंपरी-चिंचवड अर्धमॅरेथॉनमध्ये 66 अडीच हजारांपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले. मॅरेथॉनचे यंदाचे चौथे वर्ष होते. स्वच्छ, सुंदर पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
– वसंत काटे, आयोजक, यशदा पिंपरी-चिंचवड अर्धमॅरेथॉन





