पुणे जिल्हा | शाॅर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत सव्वा एकर ऊस जळून खाक

लाखणगाव, (वार्ताहर) – काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत पांडुरंग सीताराम करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळाला असून ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसात तिसरी तर महिनाभरातील ही चौथी घटना आहे.
काठापूर बुद्रुक गावातील गट नंबर ८९ मध्ये ५० गुंठे क्षेत्रावर पांडुरंग सीताराम करंडे यांनी ऊस पिकाची लागवड केली होती. या उसाला लागलेल्या आगीमुळे उस जळून गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अजून एक महिनाभर कारखाने सुरू होणार नाही. त्यामुळे हा ऊस तोडला जाणार नाही.परिणामी एक महिन्यात ऊस वाळून जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे.
एकंदरीत काठापूर येथे महावितरणचे मोठे सबस्टेशन आहे. येथून सुमारे ३५ गावांना वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे येथून वीज वाहक तारा आणि खांब मोठ्या प्रमाणात इतर गावांना गेल्यामुळे सहजपणे तारांचा जोळ असेल तिथे शॉर्टसर्किट होते.
त्याचा सर्वाधिक फटका काठापुर येथील शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसून येते. मागील पाच दिवसात तिसरी घटना झाल्याने नक्की वीज पुरवठा होत असताना तांत्रिक बिघाड तर होत नाही ना अशी शंका नागरिकांना येत आहे. कारण लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्यातरी ऊस जळण्याचे प्रमाण वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. काठापुर बुद्रुक बारमाही बागायती गाव असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची शेती केली जाते. आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो.
परंतु मागील पाच दिवसात तिसरी तर महिन्यातील चौथी घटना असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सदर ठिकाणी सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे यांनी भेट दिली.उस उत्पादक शेतकरी पांडुरंग करंडे व नवनाथ करंडे यांनी संबंधित विभागाने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
उपाय योजावे, अन्यथा आंदोलन…
काठापूर बुद्रुकमध्ये विजेच्या तारांमुळे उस जळण्याचे वाढलेले प्रमाणाने येथील ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला असून महावितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात गावातील सर्वच वीज वाहक तारा आणि खांब यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी. अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.





