Pune District : पाऊण लाख भाविक मयुरेश्वर चरणी लीन

मोरगाव : अंगारिका चतुर्थी निमित्ताने आष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यामुळे मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. पहाटे पाच ते रात्री उशीरापर्यंत सुमारे पाऊण लाख भाविकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी दिली.
पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांनी श्रींची पूजा केली. या वर्षातील ही पहिलीच अंगारिका असल्याने पहाटेपासूनच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, ठाणे अशा विविध भागातून गणेश भक्त दर्शनासाठी आले होते. दुपारी बारा वाजता ट्रस्टच्यावतीने महापूजा करण्यात आली.
भक्तांसाठी चतुर्थी निमित्ताने 100 किलो खिचडीचा महाप्रसादचे मोफत वाटप केले. भक्तांसाठी देवस्थानच्या वतीने दर्शन रांग, पिण्याची पाणी, सुरक्षारक्षक, अतिरिक्तत पोलीस मित्र, सफाई कामगार आदी जय्यत तयारी केली होती. देवस्थानने नव्याने सुरू केलेल्या व्हीआयपी दर्शन सुविधा लाभ भाविक घेत होते. राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. दिवसभर गर्दीचा ओघ सुरूच होता.
सायंकाळी सहाच्या दरम्यान गर्दी आणखी वाढली. बाजार पेठेतील पेढेतील दुकाने हार, दुर्वा, पेढे, श्रींच्या प्रतिमांनी सजवली होती. सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रात्री चंद्रोदयाच्या वेळी महानैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर झालेल्या आरतीप्रसंगी शेकडो भाविक उपस्थित होते.





