हडपसर-सासवड पालखी महामार्ग रुंदीकरण: ब्लास्टिंगमुळे दिवे घाटात दररोज ‘या’ वेळेत वाहतूक बंद

फुरसुंगी : हडपसर-सासवड पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यामध्ये दिवे घाटातील अवघड घाटमार्ग रुंद करण्यासाठी डोंगरफोड करावी लागत असून, यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. ब्लास्टिंगमुळे उडणारे दगड आणि मुरूम रस्त्यावर पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत अर्धा तास हा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जात आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि फुरसुंगी वाहतूक पोलिसांनी केले आहे.
फुरसुंगी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी माने आणि रस्ता रुंदीकरण कंपनीचे व्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “सत्यपुरम ते दिवे घाट या मार्गावर रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवे घाटातील कठीण डोंगर फोडण्यासाठी ब्लास्टिंग आवश्यक आहे. ब्लास्टिंगदरम्यान मोठे दगड हवेत उडून रस्त्यावर पडतात, ज्यामुळे दुर्घटनेचा धोका आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या वेळेत ब्लास्टिंग पूर्ण करून रस्त्यावरील दगड आणि मुरूम हटवण्यासाठी २० ते ३० मिनिटे वाहतूक बंद ठेवली जाते. यावेळी घाटाच्या पायथ्याशी आणि विसाव्याजवळ बॅरिगेटिंग केले जाते.”
वाहनचालक आणि प्रवाशांनी या वेळेत हडपसर-सासवड मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने केली आहे. पर्यायी मार्गाचा वापर शक्य नसल्यास घाटाच्या वर किंवा खाली २० ते ३० मिनिटे थांबावे लागेल, याची नोंद घ्यावी. रस्ता रुंदीकरणाच्या या महत्त्वाच्या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माने आणि श्रीवास्तव यांनी केले आहे. रुंदीकरण पूर्ण झाल्यावर हा मार्ग अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





