चांडोह-लाखणगाव पुलाला पुराचा तडाखा; वाहतूक बंद, दुर्घटनेची शक्यता

जांबूत – डिंभे धरण परिसरात मागील चार दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे घोडनदीला आलेल्या पुराच्या पाण्याने बेल्हे-जेजुरी राज्यमार्गावरील चांडोह-लाखणगाव येथील पूल पाण्याखाली गेला होता. या पुराच्या तीव्रतेमुळे आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पुलाला जोरदार हादरे बसून डांबरीकरण उखडले गेले असून पुलाला भेगा पडल्या आहेत. परिणामी, पुढील काळात पूरसदृश्य परिस्थितीत संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे.
घोडनदीला आलेल्या पुरामुळे सुमारे २६ हजार क्युसेक्स पाण्याचा एकत्रित विसर्ग झाल्याने बुधवारी (दि. २०) सकाळी हा पूल पाण्याखाली गेला होता. गुरुवारी (दि. २१) सकाळी पाण्याची पातळी कमी झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, दुपारनंतर पुलाची झालेली दुरवस्था पाहता वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली. स्थानिकांनी या पुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सध्या घोडनदीच्या पात्रातील पाण्याचा विसर्ग कमी झाला असला, तरी तब्बल २४ तास पूल पाण्याखाली होता. यामुळे पाणी पुलाच्या स्लॅबला जोराने आदळत असल्याचे दिसून आले. पुराच्या पाण्यासह वाहून आलेले जलपर्णी आणि इतर कचरा पुलाच्या संरक्षक कठड्याला अडकला असून, पुलावर खड्डे आणि भेगा निर्माण झाल्याने त्याची मोठी हानी झाली आहे.
चांडोह गावचे पोलिस पाटील सुदर्शन भाकरे यांनी पुलाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “पाण्याचा प्रवाह पुलाच्या स्लॅबला आदळत असल्याने खालच्या बाजूस झालेल्या नुकसानीचा अंदाज येत नाही. वाहतूक सुरू राहिल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.” त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद करून वाहने पर्यायी मार्गाने वळविली आहेत. भाकरे बुधवारपासून या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
सध्याच्या परिस्थितीत या पुलाच्या दुरुस्तीची गरज असून, जोपर्यंत योग्य उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचे स्थानिकांचे मत आहे.





