Gwalior Accident : ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात ! गर्दीत ट्रक घुसल्याने 15 भाविकांचा मृत्यू
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधील शीतला माता मंदिराजवळ शनिवारची मध्यरात्र उलटल्यानंतर एक भीषण रस्ते अपघात (Gwalior Accident) घडला.

Gwalior Accident : मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधील शीतला माता मंदिराजवळ शनिवारची मध्यरात्र उलटल्यानंतर एक भीषण रस्ते अपघात (Gwalior Accident) घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दर्शनासाठी मंदिरात जाणाऱ्या भाविकांना चिरडले. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. आतापर्यंत, मृतांपैकी ११ जणांची ओळख पटली आहे.
ग्वाल्हेरमधील चिनाउर रोडवरील शीतला माता मंदिराजवळ मध्यरात्रीनंतर १:३० च्या सुमारास हा अपघात घडला. नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत होते. त्याच वेळी, तांदळाने भरलेला ट्रक अनियंत्रित (Gwalior Accident) झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
ट्रकने बॅरिकेड्स तोडले आणि चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक मंदिराच्या प्रवेशद्वाराला आणि बाहेरील भिंतीला धडकला. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. पोलीस, प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी बचावकार्य सुरू केले. दोन पोलिसांसह जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
सात जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आरटीओ पथक ट्रकच्या तांत्रिक स्थितीची तपासणी करेल. ट्रक नियंत्रणाबाहेर का गेला आणि त्याने बॅरिकेड तोडून प्रतिबंधित मार्गात प्रवेश कसा केला, याचीही चौकशी केली जाईल. आतापर्यंत, मृतांपैकी ११ जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये किशोरवयीन ते वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. मृतांचे कुटुंबीय या अपघातामुळे शोक व्यक्त करत आहेत.
अनेक पोलिस निलंबित
ग्वाल्हेरमधील शीतला माता मंदिराजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातानंतर पोलीस विभागात कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निर्देशानुसार, झाशी रोडचे सीएसपी रवी भदौरिया यांना हटवण्यात आले आहे. तीन ठाणेदारांसह आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अपघातात भाविकांच्या मृत्यूनंतर, सरकारने पोलिसांची भूमिका आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी (Gwalior Accident) जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.






