काळेपडळ येथे ६६ लाखाचा गुटखा जप्त; म्होरक्या अटक, अन्य साथीदार फरार

पुणे : शहरातील उंड्री भागात अवैधरीत्या छुप्या पद्धतीने गुटख्याचा साठा करून त्याची विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. काळेपडळ पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल ६६ लाखांचा गुटखा तसेच चार पिकअप पोलिसांनी जप्त केले असून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. दरम्यान, या रॅकेटकडून पुणे शहर आणि ग्रामीण भागामध्ये गुटखा विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय आहे. त्याअनुषंगाने तपास केला जात आहे.
संपतराज पेमाराम चव्हाण (वय-३८, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चव्हाण याच्यासह त्याच्या सुरेशकुमार पेमाराम भाटी (४०, रा. परिहास चौक, औंध) प्रकाश भाटी, भवर भाटी, निजाम शेख, संदीप ढाका, आशु गुप्ता आणि गुप्ता नावाच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रकाश भाटी आणि निजाम शेख यांच्यावर अगोदर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचे रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरु आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार उनावने यांनी फिर्याद दिली आहे.
राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असले तरी पुण्यात सातत्याने गुटखा वाहतूक आणि विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार वारंवार कारवाई देखील केली जात आहे. चोरी-छुप्या पद्धतीने हा व्यवसाय चालतो. दरम्यान, वडाचीवाडी रोड, घुले वस्ती उंड्री या भागात गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाला मिळाली.
त्यानुसार काळेपडळ पोलीस व एफडीएचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी गोडाऊनमध्ये विविध प्रकारचा गुटखा, सुगंधित तंबाखू , पान मसाला आढळून आला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पसार झाले. येथून पोलिसांनी संपतराज याला ताब्यात घेतले. गोडाऊनच्या बाहेर मालाची ने आण करण्यासाठी चार गाड्या उभ्या होत्या.
पोलिसांनी या चारही पिकअप जप्त केले आहेत. पथकाने येथून एकूण ६४ लाख ४४ हजारांचा गुटखा आणि १२ लाख रुपये किमतीची वाहने असा ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
करोडोंची उलाढाल
शहर आणि ग्रामीण भागात या टोळीचे मोठे वर्चस्व आहे. त्याच्या म्होरक्या मार्फत ते महिण्याला करोडो रुपयांचा बेकायदा गुटखा विकत असतात. मागील काही वर्षात या टोळीने बेकायदा गुटखा विक्रीचे जाळे उभारले आहे. प्रत्येक वेळी ते विक्रीसाठी नवीन सदस्यांची भरणा करतात. विशेषत: उपनगर आणि ग्रामीण भागातील गोडाऊनमध्ये ते साठा करतात. तेथून कोंढवा, राजगड, हडपसर, येरवडा, कोथरुड, भारती विद्यापीठ अशा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ते मालाची डिलिव्हरी करतात. तेथून किरकोळ विक्रेते माल उचलतात.





