Gurupurnima Narayanpur: दिंगबराच्या जयघोषाने श्रीक्षेत्र नारायणपूर दुमदुमले! गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांचे मांदियाळी
Gurupurnima Narayanpur: श्रीक्षेत्र नारायणपूर येथे प. पू. टेंबे स्वामी महाराजांच्या आधिपत्याखाली गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य आध्यात्मिक सोहळा संपन्न.

Gurupurnima Narayanpur – पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे प. पू. श्री नारायण महाराज (अण्णा) यांच्या कृपाशीर्वादाने आणि प. पू. टेंबे स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली बुधवारी (दि.२९) रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त एकदिवसीय भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यासाठो राज्यातून लाखो भाविकभक्तांनी उपस्थिती लावत श्री दत्तमहाराज व प. पू. नारायणमहाराज यांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.
यावेळी दिगंबरा दिगंबरा या जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमले होते. गुरुपौर्णिमा सोहळ्याची सुरुवात पहाटे ४ ते ६ या वेळेत श्री दत्त मंदिरातील एकमुखी व त्रिमुखी दत्तमूर्ती तसेच श्री नारायणेश्वर (महादेव) मंदिरातील रुद्राभिषेकाने करण्यात आली. सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री नारायण महाराज समाधिस्थळी रुद्राभिषेक, तर सकाळी ६ ते ८ या वेळेत काकड आरती केली.
सकाळी ८.३० वाजता आरती, त्यानंतर सकाळी ९ ते १०.३० या वेळेत होमहवन, सकाळी ११ वाजता दीपप्रज्वलन व मान्यवरुंचे स्वागत करून ११.३० वाजता व्यासपूजन झाले. दुपारी १२ वाजता सदुगूरू नारायणअण्णा महाराजांच्या पादुकांचे भाविकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मान्यवरांचे मनोगत होऊन पोपट टेबे स्वामी महाराजांचे प्रवचन व गुरुपौर्णिमेच्या निमित्त मार्गदर्शन झाले.
आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी सामुदायिक दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सायंकाळी शिष्यांसाठी गुरुपूजनाचा कार्येक्रम झाला. रात्री आरती झाल्यानंतर पालखी सोहळा आयोजित केला होता. रात्री १०.३० वाजता शेजारती करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन श्री दत मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांनी केले असून त्यांच्या सहकार्यासाठी हजारो भक्तगन व नारायणपूर ग्रामस्थ होते. नगरपालिकेमार्फत अग्रिशमन दलाची गाडी, पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते. मोबाइल शौचालये तसेच फॉगिंग यंत्रणेची सुविधा दिल्या होत्या. वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, आदी सुविधांसाठी विशेष नियोजन केले होते.




