कराड – गुंड पवन सोळवंडे खून प्रकरणी वापरलेले पिस्तुल सोमवारी पोलिसांनी संशयितांकडून जप्त केले. त्यांच्याकडून आणखी पिस्तुल, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या याबाबत कसून तपास सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी अटक केलेल्या अन्य सात संशयितांना सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अक्षय ऊर्फ महादेव संजय मोकाशी (वय 25 रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर), सिकंदर बाबू शेख (वय 29 रा. विंग, ता. कराड), निरज आनंदराव पाणके (वय 26 रा. शिवराज कॉलनी, कोयनावसाहत, कराड), प्रमोद ऊर्फ आण्णा तुकाराम जाधव (वय 37 रा. पंचमुखी निवास, साईनगर, कराड), विजय बिरू पुजारी (वय 20 रा. यशवंतनगर, बैलबाजार रोड, मलकापूर), दिवाकर ऊर्फ गोंड्या बापूराव गाडे (वय 27 रा. साईनगर, मलकापूर), सोहेल राजूभाई मुलाणी (वय 28 रा. ज्ञानदीप कॉलनी, ए. जे. एम. नगर, मलकापूर, कराड) अशी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन सोळवंडे याचा मंगळवार, दि. 20 ऑगस्टच्या मध्यरात्री गोळ्या घालून खून झाला होता.
खून प्रकरणात पोलिसांनी अल्ताफ पठाण, जुनेद शेख यांच्यासह आठ संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांच्याकडून एक पिस्टल व खूनाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी सात जणांची नावे निष्पन्न झाले. त्याचबरोबर एका अल्पवयीन मुलाचेही नावसमोर आले आहे. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आणखी सात संशयितांना शनिवारी रात्री अटक केली. अटकेतील सात संशयितांना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आले.
सहा संशयितांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. औटी यांच्यासमोर हजर करण्यात आले. अटकेतील प्रत्येकाने खुनाच्या कटात काही ना काही भूमिका बजावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होत आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे करीत आहेत.