पाकिस्तानी नागरिकांना आखाती देशांकडून व्हिसा बंदी

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील ३० वेगवेगळ्या शहरांमधील नागरिकांना आखातातील अनेक देशांनी बेमुदत काळासाठी व्हिसा बंदी जाहीर केली आहे. ही व्हिसा बंदी लागू करणाऱ्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि अइन्य आखाती देशांचा समावेश आहे. (Gulf Countries bans Visa for Pakistan)
या आखाती देशांमध्ये पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने भीक मागत असल्याचे आढळून आले आहे. तसेच तस्करी, अमली पदार्थांची वाहतूक, मानवी तस्करी आणि अन्य गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकच सर्वाधिक सहभागी असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानमधून आखाती देशांमध्ये जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांकडून विदेशात गुन्हेगारी कारवाया केल्या जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आल्यामुळे आखाती देशांनी हा व्हिसाबंदीचा निर्णय घेतला आहे.
आखाती देश आणि तेथील मोठ्या शहरांमध्ये, विशेषत: दुबई आणि अबू धाबी ही लाखो पाकिस्तानी प्रवासी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत. तथापि, व्हिसाबंदी आणि व्हिसा नाकारण्याच्या वाढत्या उदाहरणांमुळे पाकिस्तानी पासपोर्टची आधीच खराब झालेली प्रतिमा सलग तिसऱ्या वर्षी जगात चौथ्या क्रमांकावर पोचली आहे. आता व्हिसाबंदीच्या निर्णयामुळे पाक पासपोर्टचे कधीही भरून निघू न शकणारे नुकसान होईल.





