Gulabrao Patil Plane: मंत्री गुलाबराव पाटलांचे विमान उड्डाण रद्द; नेमकं काय घडलं?
Gulabrao Patil Plane: लातूर विमानतळावरून विमानाला आवश्यक 'क्लिअरन्स' न मिळाल्याने त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले.

Gulabrao Patil Plane: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना हवाई प्रवासात तांत्रिक अडथळ्याचा सामना करावा लागला. लातूर विमानतळावरून विमानाला आवश्यक ‘क्लिअरन्स’ न मिळाल्याने त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले. अखेर, वेळेची मर्यादा आणि तांत्रिक अडचण लक्षात घेता त्यांनी कारने छत्रपती संभाजीनगरकडे जाण्याचा निर्णय घेतला.
नेमकं काय घडलं?
मंत्री गुलाबराव पाटील हे लातूर जिल्ह्यातील निवडणूक प्रचारासाठी दौऱ्यावर होते. सभा आटोपल्यानंतर ते सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ‘एव्होसेट एव्हिएशन’ कंपनीच्या सहा आसनी विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार होते. नियमानुसार उड्डाणासाठी हैदराबाद, बिदर आणि चेन्नई हवाई नियंत्रण कक्षाकडून (ATC) क्लिअरन्स मिळणे आवश्यक होते. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही हा क्लिअरन्स मिळाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने दोनवेळा उड्डाणाचा प्रयत्न केला, परंतु तांत्रिक परवानगीअभावी धावपट्टीवरूनच परतावे लागले. लातूर विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाची पुरेशी सोय नसल्याने आणि सायंकाळचे पाच वाजल्याने पायलटने उड्डाण करण्यास असमर्थता दर्शवली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अखेर हवाई प्रवास रद्द करण्यात आला.
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्येही बिघाड –
दोन दिवसांपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे निघण्यापूर्वीच वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अनर्थ टळला होता. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील मंत्री आणि बडे नेते हवाई प्रवासाबाबत अधिक खबरदारी घेताना दिसत आहेत.
प्रचाराचा धडाका सुरूच –
विमान उड्डाण रद्द झाल्याने गुलाबराव पाटील यांचा पुढचा प्रवास लांबला असला, तरी त्यांनी रस्तेमार्गे जाणे पसंत केले. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचा हा अंतिम टप्पा असल्याने मंत्र्यांचे दौरे नियोजित आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हवाई प्रवासातील या व्यत्ययांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
NCP Merger: राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा! शिवसेना नेते का घेताहेत शरद पवारांची बाजू?





