‘अर्थ’सारखं नालायक खातं नाही – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेकदा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येते. पण, पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यांमध्ये येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो, असे विधान करत अर्थ विभागाच्या कामाबद्दल शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी उघड नाराजी बोलून दाखवली.
जळगावमध्ये हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले, सरकारमध्ये राज्यमंत्र्याला फारसे काही करून घेता येत नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. मंत्र्याने आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना खुश ठेवले, तरच चांगले काम होऊ शकते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मी माझ्या खात्यामधील अनेकांना पदोन्नती दिली असून माझ्यासारखा पदोन्नती देणारा दुसरा कोणी नसेल. मी कोणी देवदूत नाही. मी गरिबी अगदी जवळून पाहिली आहे. कष्टकऱ्यांचे पैसे जे खातात, त्यांचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेला पाणी पाजण्याचे पुण्याचे काम मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच कामे करायची आहेत. राजकारणात जिथे गरज असेल, तिथेच मंत्री म्हणून बडेजावपणा केला. किती लोकांची कामे केली हे महत्त्वाचे आहे. निवडणुकीत हेच आशीर्वाद कामाला येणार आहेत, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, राज्यातील निवडणुकींच्या तोंडावर अनेकदा महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटांमधील नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळाला आहे. नुकतेच, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच प्रचार करताना जाणूनबुजून अजित पवार गटाने ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळला, असा आरोप शिंदे गटाने केला होता. या दोघांमध्ये श्रेय वादातून खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.





