जळगाव : हवे तर तुम्ही शंभर जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे पन्नास जागा लढतो पण युती करा,जर युती केली नाही तर कार्यकर्ते मरुन जातील असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला केले आहे. आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीत युती केली जाते, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती का करत नाहीत असा प्रश्न यावेळी गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. दोन चार जागा इकडे तिकडे करा, पण युती करा. भाजपावाले एकीकडे आपल्याला युती करायची असे सांगतात आणि एकांतात स्वबळाची भाषा बोलतात.त्यामुळे भाजपावाल्यांना आपले सांगणे आहे, जिल्हा परिषद निवडणुकात ते वेगवेगळेचे वारे तयार करत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते मरून जातील. तुम्ही शंभर जागा लढले तर आम्ही पन्नास तरी लढू. पण कार्यकर्त्याला मोठे करण्याची हीच निवडणूकीची संधी असते. त्यामुळे कार्यकर्त्यासाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे.असे ते म्हणाले. राजकारणात विरोधक असायला हवे, तरच राजकारण चालेल. विरोधक हे होकायंत्राप्रमाणे असतात. त्यांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शक असल्याने फायद्याची ठरते.आमच्यावर विरोधक किती टीका करतात. लोक हुशार झाले आहेत, पहिल्या वेळेस निवडून येता येते. मात्र सलग तीन चार वेळा निवडून आला तो खरा नेता असतो. आमच्यावर गद्दार म्हणून नेहमीच टीका झाली आहे, अजूनही होत आहे.आमचे काम आहे टीका ऐकण्याचे असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.