पुणे | देसाई महाविद्यालयामध्ये गुजराती भाषा गौरव दिन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाषा हा केवळ अभ्यासाचा विषय नसून, विविध प्रकारे प्रादेशिकता जोपासणाऱ्या सामाजिक घटकांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे उद्गार एसएनडीटी येथील गुजराती भाषा विभागप्रमुख डॉ. हेतल बारोट यांनी काढले. भाषेशिवाय समाज जीवनातील दैनंदिन व्यवहार पूर्ण होणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले.
थोर कवी, साहित्यिक, नाटककार नर्मदाशंकर दवे यांचा जयंतीदिन दि पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरीभाई व्ही. देसाई महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक भाषा संवर्धन: काळाची गरज या विषयावर डॉ. बारोट यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे सचिव हेमंत मणियार, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव उपस्थित होते.
यानिमित्ताने दरवर्षी आंतरमहाविद्यालयीन विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा संस्थेचे सचिव हेमंत मणियार यांनी केली.
सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर घोडके यांनी केले. प्रास्ताविक प्रा. श्वेती चंदन यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. चेतना आदातिया यांनी केले.




