क्रिकेट काॅर्नर : विजय शंकरवर वरदहस्त कोणाचा

भारतीय क्रिकेट संघात अनेक खेळाडू असे होते व आहेत की त्यांना संघात स्थान कसे काय मिळवू शकले, हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. विजय शंकर हा खेळाडूही याच यादीतील.
आता त्याला भारतीय संघात स्थान मिळत नसले तरीही तो आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. नजरेत भरेल अशी कोणतीही कामगिरी त्याच्याकडून आतापर्यंत झालेली नाही. तरीही त्याचे गुजरात टायटन्स संघातील स्थान कायम राहात आहे. आता हाच प्रश्न समोर येतो की त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे. असे वशिल्याचे तट्टू गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या संघात तसेच आयपीएल स्पर्धेतील विविध संघात आपल्याला पाहायला मिळतात.
साई सुदर्शन या नवोदित व अफाट गुणवत्ता असलेल्या खेळाडूला डावलून विजय शंकरची निवड कशी होते, तेच समजेनासे झाले आहे. गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने अपयशी ठरुनही त्याचा समावेश होत असल्याने माजी क्रिकेटपटू, समालोचक तसेच आता तर प्रेक्षकी सवाल करू लागले आहेत. साई सुंदरमला दोन सामन्यात संधी मिळाली. त्यात त्याने 35 व 11 धावा केल्या.
मात्र, या दोन्ही डावात त्याने स्थिरावलेल्या फलंदाजाला साथ दिली. तिच भागिदारी संघाच्या विजयात मोलाची ठरली. दुसरीकडे विजय शंकरला तीन सामन्यांत संधी मिळाली. यात त्याने 4, 13 व 2 अशा धावा केल्या आहेत. ही इतकी मोठी कामगिरी आहे का की ज्याच्या जोरावर त्याचे संघातील स्थान कायम राहात आहे.
हा विजय शंकर तोच खेळाडू आहे की ज्याच्यासाठी भरात असलेल्या अंबाती रायडूला संघाबाहेर काढून 2019 सालच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ खेळला होता. त्यावेळी संघातून का बाहेर काढले गेले याचे सबळ कारणही रायडूला बीसीसीआयने दिले नव्हते. यामुळेच रायडूने निराशा व्यक्त करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यावेळी तडकाफडकी निवृत्ती घेतली होती.
रायडू आजही चेन्नई सुपर किंग्जकडून अफलातून कामगिरी करत आहे. असेच जर बीसीसीआयचे व निवड समितीचे धोरण असेल तर संघात असे वशिल्याचे तट्टू यापुढेही येत राहतील व खरोखरच गुणवत्ता असलेल्या खेळाडूंवर अन्याय होत राहिल.





