Gujarat Titans bus : मोठी बातमी.! खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या बसला आग; थोडक्यात वाचला जीव, नेमकं काय घडलं?
प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच बसच्या आत धूर पसरू लागल्याने एकच गोंधळ उडाला.

Gujarat Titans bus : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यातील पराभवाचा धक्का अजून ताजा असतानाच गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट ओढावले. अंतिम सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना संघाच्या बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, वेळेत खबरदारी घेतल्यामुळे शुबमन गिलसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुरक्षित बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला अंतिम सामना संपल्यानंतर गुजरात टायटन्सचे खेळाडू टीम बसने हॉटेलकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच बसच्या आत धूर पसरू लागल्याने एकच गोंधळ उडाला.
त्या वेळी संघाचा कर्णधार शुबमन गिल, जोस बटलर आणि इतर सर्व खेळाडू बसमध्येच उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संघ व्यवस्थापन, सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ हालचाली करत सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढले.
🚨 MASSIVE SCARE FOR GUJRAT TITANS !🤯
– After losing to RCB in the IPL final today, the Gujarat Titans team bus was traveling from Narendra Modi Stadium to its destination when a sudden short circuit occurred in the bus, causing flames to emerge. However, the good news is that… pic.twitter.com/g6ATXSrIkZ
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) May 31, 2026
घटनेनंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ काही काळ रस्त्याच्या कडेला थांबून होते. दुसऱ्या वाहनाची व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण संघाला सुमारे एक तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर पर्यायी बसद्वारे सर्वांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंतिम सामन्यातील पराभवानंतर लगेचच घडलेल्या या घटनेमुळे खेळाडू आणि व्यवस्थापनाची चिंता वाढली होती.
आधी पराभव, मग अपघाताचा धक्का :
रविवारी झालेल्या आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गुजरातच्या विजेतेपदाच्या आशा धुळीस मिळाल्या. या निराशाजनक पराभवानंतर काही तासांतच टीम बसला आग लागल्याची घटना घडल्याने संघासाठी दिवस अधिकच कठीण ठरला.
सामना जिंकवून देणारी खेळी :
१५६ धावांचे लक्ष्य गाठताना व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीने आरसीबीला स्फोटक सुरुवात करून दिली. व्यंकटेश अय्यरने चार चौकार आणि दोन षटकारांसह १६ चेंडूंमध्ये ३२ धावा ठोकल्या. मात्र देवदत्त पडिक्कल केवळ एका धावेवर बाद झाला.
त्यानंतर रशीद खानने एकाच षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या यांना बाद करून गुजरातच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने एक बाजू सांभाळून धरली.
यातनंतर टीम डेव्हिडने १७ चेंडूंमध्ये २४ धावा करून संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान, विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा करून संघाचा विजय निश्चित केला.





