नवी दिल्ली – गुजरातमधील हेरॉईन जप्ती आणि ऍमेझॉन कंपनीशी संबंधित कथित लाचखोरी ही दोन्ही प्रकरणं देशाला हादरवणारी आहेत. त्या प्रकरणांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी. ती प्रकरणं राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उत्तर द्यावे, अशी मागणी बुधवारी कॉंग्रेसने केली.
गुजरातच्या मुंद्रा बंदरावर तब्बल 21 हजार कोटी रूपयांच्या हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. त्या बंदराचे व्यवस्थापन अदानी समुहाकडे आहे. एकीकडे ती हेरॉईन जप्ती चर्चेचा विषय ठरला असतानाच दुसरीकडे स्वतंत्र ऍमेझॉन प्रकरण पुढे आले आहे.
ऍमेझॉन कंपनीने भारतातील कायदेशीर प्रक्रियेच्या शुल्कापोटी तब्बल 8 हजार 546 कोटी रूपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. त्या प्रकरणात लाचखोरीचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दोन्ही प्रकरणांवरून कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
संबंधित प्रकरणांबाबत कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी भूमिका मांडली. देशात अंमली पदार्थांच्या तस्करीचे भलमोठे रॅकेट सक्रिय असून भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवण्याचा कट असल्याचे गुजरातमधील प्रकरणावरून स्पष्ट झाले, असे ते म्हणाले. ऍमेझॉन प्रकरणातील लाच मोदी सरकारमधील कुणाला मिळाली का, असा सवालही त्यांनी केला.