नवी दिल्ली – अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम)चे नाव बदलण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान पूर्वी सरदार पटेल, मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जात होते. मात्र नामांतरानंतर या स्टेडियमला मोदींचे नाव दिले आहे. यावरून पंतप्रधान मोदींवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र आता भाजपच्या नेत्यानेच स्टेडियमच्या नामांतरावर आक्षेप घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करून गुजरात सरकारला याबाबत सल्ला दिला आहे. गुजरातचा जावई या नात्याने राज्यातील अनेकांनी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलल्याबाबत मला विचारणा केली. गुजरात सरकारने आपली चूक सुधारावी आणि स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घ्यावे. स्टेडियमला नाव देण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली नव्हती, हेदेखील गुजरात सरकारने सर्वांसमोर स्पष्ट करावे’, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
As a son in law of Gujarat, many from the state have informed me of their agony over the removal of Sardar Patel’s name from the Stadium. My suggestion is that Gujarat Government cuts its losses and say since Modi was not consulted in the name change therefore it is withdrawn.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 26, 2021
यापूर्वी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी स्टेडियमच्या नामांतरावरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तर शिवसेनेने देखील स्टेडियमच्या नामकराणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता स्वामी यांनी मागणी केली आहे.