Gujarat Election Result 2022 : पूल कोसळून 135 जणांचा बळी गेलेल्या मोरबीमध्ये भाजपचा मोठा विजय

मोरबी – मोरबी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कांतीलाल शिवलाल अमृतीया चांगल्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार जयंती पटेल यांचा पराभव केला. मोरबीमध्ये कांतीलाल शिवलाल यांना 1,14,538 मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार जयंतीलाल पटेल यांना 52,459 मते मिळाली. काँग्रेस उमेदवाराचा 62,079 मतांनी पराभव झाला आहे.
मोरबी येथे पूल कोसळण्याची दुर्घटना ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडली होती. त्यात 135 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पुलाच्या दुरूस्तीचे काम दिले गेले यावरून भाजपची कोंडी करण्यात आली होती. त्यामुळे मोरबीच नाही तर संपूर्ण राज्यातच भाजपला सत्ता गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र तेव्हाच विद्यमान आमदाराला बाजूला ठेवून भाजपने अमृतीया यांना रिंगणात उतरवले. कारण दुर्घटनेत लोकांना वाचवण्यासाठी स्वत: अमृतीया यांनी पाण्यात उडी मारली होती. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. या घटनेनंतर अमृतीया हिरो ठरले होते व मतदारांनी त्यांना विजयी करून त्यांच्यावर विश्वास टाकला.
Gujarat Election Result 2022 : ठरलं! BJP कडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ बड्या नावाची घोषणा!
अगोदर ब्रिजेश मेरजा विधानसभेत मोरबीचे प्रतिनिधीत्व करत होते व ते सरकारमध्येही मंत्री होते. भाजपने त्यांचे तिकिट कापून अमृतीया यांना रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत मेरजा कॉंग्रेसकडून विजयी झाले होते व नंतर भाजपमध्ये दाखल झाले होते. तर 2020 च्या पोटनिवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.





