मनसेचा दोन वर्षांनंतर गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

मुंबई – राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी पुण्यात झालेल्या मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी बोलताना आजचं भाषण केवळ ट्रेलर आहे, 2 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात पूर्ण पिक्चर असेल, असे म्हटले होते.
त्यानंतरच राज ठाकरेंच्या उद्या पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या गुढीपाडवा आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळवा होणार आहे. यासाठी तयारी देखील जोरदार सुरु आहे.
राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचे मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केले होते.
दुसरीकडे 23 जानेवारीच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास पकडली आणि राज्यातील हिंदुत्वाची पोकळी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेची जागा खाली झाल्यानंतर ती जागा घेण्याचा प्रयत्न अजूनही म्हणावा तसा मनसेकडून पाहायला मिळत नाही. याबाबत देखील उद्या राज ठाकरे बोलू शकतात, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.





