पालकमंत्री साहेब, आरोग्य यंत्रणेचे पोस्टमॉर्टेम करा

विजय लाड
कोयनानगर – डोंगराळ, दुर्गम, आपत्तीग्रस्त अशा एक ना हजार बिरुदावली मिरवणारा पाटण तालुका खरोखरच वैद्यकीय गोष्टींबाबत रंजलेला-गांजलेला आहे. तालुक्यातील सलाईनवर असणारी आरोग्य यंत्रणा शेवटच्या घटका मोजत असून आरोग्य यंत्रणेच्या कुचकामीपणामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि सध्या राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या ना. शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे पोस्टमॉर्टेम करून आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी पाटणला अद्ययावत रुग्णालय उभारावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सामान्य जनतेला रोगच खात असल्याचे भयानक वास्तव करोना महामारीत सर्वाधिक म्रुत्यूचा आकडा तालुक्याने ओलांडल्यामुळे स्पष्ट झाले. श्रीमंत लोक मोठया हॉस्पीटलमध्ये जावून अद्ययावत उपचार घेऊन बरे होतात. परंतु, सर्वसामान्य नागरिक मात्र उपचाराअभावी जीवाला मुकत आहेत. त्यामुळे मृतावस्थेत असणाऱ्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला वेळीच बळकटी दिली नाही, तर विकासकामांत जोमात असणारा पाटण तालुका निष्क्रीय आरोग्य यंत्रणेमुळे कोमात जाण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या अपघातानंतर जाग आलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून पाहणी करत आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याचे सूतोवाच केले आहेत. मात्र, ते ज्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्या पाटण तालुक्याची आरोग्य यंत्रणाही सध्या सलाईनवर आहे.
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले आरोग्यदायी योजना सर्वसामान्य जनतेला दिली. यामुळे अनेक गोरगरीब, सर्वसामान्य लोकांना आधार मिळाला. पाटण तालुक्यात कोट्यावधीचा विकास होत आहे. मात्र, येथील जनतेला शुल्लक गोष्टीलाही कराड, सातारा, पुणे, कोल्हापूर सारखी शहरे जवळ करावी लागतात. तालुका वैद्यकीय क्षेत्रात अजूनही “मागास’ राहिला असून एक ही अद्यावत, सर्व सोई-सुविधांयुक्त रुग्णालय तालुक्यात नसल्याचे दुदैव आहे.
सरकारी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सावळा गोंधळ नेहमीच सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळतो. अपुरा कर्मचारी वर्ग, सोई-सुविधांचा अभाव, वर्षानुवर्षे ठिय्या मांडून बसलेले काही कर्मचारी, ओस पडलेली रुग्णालये, सर्वसामान्य लोकांना दिली जाणारी वागणूक यांमुळे सरकारी दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वेळोवेळी धिंडवडे निघतात. खाजगी दवाखाने सतराशे साठ. पण, वेळला एकही कमी येत नाही. रात्री-अपरात्री एखादी गंभीर घटना घडल्यास डॉक्टर झोपेतून उठण्याची तसदीही घेत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे लोकांना कराडला जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. किरकोळ पोटदुखीपासून हार्ट ऍटॅक सारख्या गोष्टींसाठी कराडचा रस्ता धरावा लागतो. परंतु, कराड-चिपळूण रस्त्याची दुरावस्था पाहता ऍटॅकचा रुग्ण रस्त्यातच कराडला पोहचण्याअगोदर गदावतो, हेही वास्तव आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमध्ये समाविष्ट दवाखाने बहुतांश शहरातील आहेत. तालुक्यातील लाखांच्या घरातील लोकसंख्येने काही झालं, तरी उपचार घ्यायला तालुक्याबाहेरचं जावे लागते. राज्यात चमकदार कामगिरी करणारी रत्ने पाटण तालुक्यात आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा समर्थ वारसा पुढे त्याच चालविणारे पालकमंत्री शंभूराज देसाई हे तालुक्यात छप्पर फाडके निधी आणून तालुका विकसीत करत आहेत. पण, या तालुक्यात सुसज्ज रूग्णालय नाही.
पाटण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देवून त्याठिकाणी 100 खाटांचे वाढीव रूग्णालय उभारण्याचे बहुउद्देशीय काम रखडले आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय आधिकारी राहत नसल्याने जनतेच्या जिवाला धोका आहे.
कोयना प्रकल्प रुग्णालयात मनमानी कारभार
कोयना भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी केवळ सकाळी 10.30 ते सायं. 5 वाजेपर्यंत घेण्यात येते. हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र व कोयना प्रकल्प शासकीय रूग्णालय मनमानी कारभार करत असल्याच्या जनतेसह लोकप्रतिनिधींच्याही तक्रारी आहेत. कोयना प्रकल्पाच्या रुग्णालयात तर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक खटाव तालुक्यातील कलेढोण येथील शासकीय रुग्णालयातील आहे. मात्र, सदरचा आदेश धाब्यावर बसवून वैद्यकीय आधिकारी दोन वर्षांपासून कोयना प्रकल्प रुग्णालयात पाट्या टाकण्याचे काम करत असून याला जिल्हा शल्यचिकित्सकांची मूकसंमती आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.





