कुणबी प्रमाणपत्रावरुन पालकमंत्री भडकले! धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा घेराव, अधिकाऱ्याला फोनवर झापलं

धाराशिव, : धाराशिव जिल्ह्यात कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी कुणबी पुरावे असतानाही जात वैधता समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याचा आरोप केला.
यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या घेरावादरम्यान सरनाईक आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. संतप्त सरनाईक यांनी थेट अधिकाऱ्याला फोनवरुन खडसावत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरनाईक यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी सरनाईक यांनी जात वैधता समितीच्या अधिकाऱ्याला फोन लावून जाब विचारला. “दीड महिन्यांपूर्वी आणि यापूर्वी दोनदा आदेश देऊनही का काम होत नाही? तुमच्यामुळे शासनाला आणि आम्हाला त्रास होतोय. तुम्ही जबाबदार आहात,” असे म्हणत सरनाईक यांनी अधिकाऱ्याला फैलावर घेतले. नियमानुसार पुरावे असलेल्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मराठा कार्यकर्त्यांनी आरोप केला की, जात वैधता समिती जाणीवपूर्वक अडवणूक करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. यापूर्वीही सरनाईक यांनी आदेश दिले होते, पण अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे कार्यकर्ते संतप्त झाले. सरनाईक यांनी आता तातडीने कारवाईचे आश्वासन दिले असून, याप्रकरणी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





