Pratap Sarnaik : मनसेच्या मोर्चावरून राजकारण तापलं! गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी….; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?

Pratap Sarnaik : आज ८ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी अस्मितेचा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी मोठी कारवाई करत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांना आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. तसेच संदीप देशपांडे, राजू पाटील यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजाविल्या आहेत.
यामुळे अमराठी लोकांसाठी मोर्चाला परवानगी मिळते, पण मराठी मोर्चासाठी परवानगी मिळत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. अशातच आता पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामुळे मनसेच्या मोर्चावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. परिवहन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांची याविषयी प्रतक्रिया समोर आली आहे.
गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत असल्याचे प्रताप सरनाईकांनी सांगितले. तसेच पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे, असेही प्रताप सरनाईक यांनी बोलताना सांगितले.
तुम्हाला काय उडचण होती?
प्रताप सरनाईकांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. व्यापारांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती, तुम्हाला काय उडचण होती? असा थेट सवाल त्यांनी पोलिसांना केला आहे. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असेही प्रताप सरनाईक यावेळी बोलताना म्हणाले.
अनेकांना घेतले ताब्यात
मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अविनाश जाधव आणि मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी आज पहाटे अविनाश जाधव यांना तब्यात घेतले आहे. तसेच मनसेच्या मीरा भाईंदर येथील इतरही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर देण्यासाठी हा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगण्यात आले होते. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत मनसैनिकांना नोटीसा बजवल्या होत्या.





