जीएसटी दर कमी होणार!

मुंबई – घसरणारा रुपया आणि कच्च्या मालाच्या किमती महाग झाल्यामुळे विविध वस्तूंचे दर सध्या जास्त आहेत. यातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेने जीएसटी सुसूत्रीकरणाचेे काम संपुष्टात आणले आहे. या विषयावर आगामी जीएसटी परिषदेत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जीएसटी करांच्या सुसूत्रीकरणासाठी जीएसटी परिषदेने एक समिती नेमली होती. या समितीने या अगोदरच आपला अंतिम अहवाल सादर केलेला आहे. या अहवालावर जीएसटी परिषद विचार करीत आहे. या समितीने जीएसटीचे टप्पे कमी करण्याचीही शिफारस केलेली आहे.
या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी आगामी जीएसटी परिषद बैठकीत होण्याची शक्यता आहे. तसे संकेत गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. जर खरोखरच जीएसटीचे दर कमी झाले आणि टप्पे कमी झाले तर सध्याच्या महागाईच्या दिवसात जनसामान्यांना थोडाफार आधार मिळण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत या विषयावर विचार करण्यात आला. करांचे सुसूत्रीकरण कसे करता येईल, त्याचबरोबर कराचे टप्पे कसे कमी करता येतील यावर विचार करण्यासाठी सहा राज्याच्या अर्थमंत्र्यांची समिती नेमण्यात आली होती.
जगातील इतर देशापेक्षा भारतातील जीएसटीचे टप्पे जास्त आहेत.
त्यामुळे करदात्यांना कर भरताना आणि कर विभागाला कर संकलित करताना गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती. परवा मुंबईत एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सितारामन आल्या असता पत्रकारानी त्यांना जीएसटीसंदर्भात प्रश्न विचारला त्यावेळी सिताराम म्हणाल्या की, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. जीएसटी परिषद या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.
पुढच्या बैठकीत चर्चा होणार
लवकरच जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत संबंधित विषयावर पुन्हा तपशिलात चर्चा होणार आहे. यावेळी हा निर्णय कधी घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची या सदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे. एखाद्या राज्याला किंवा अर्थमंत्र्यांना या संदर्भात निर्णय घेत आहे नसतो.





