Satara News : गट, गण निश्चित; आता नजरा आरक्षणाकडे; पाटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात

अरुण पवार / पाटण : गेली अनेक वर्षे लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होणार असून, गट आणि गण जाहीर झाले आहेत. पाटण तालुक्यात २०१७ चा फॉर्म्युला वापरण्यात आला असून, जिल्हा परिषदेसाठी सात गट आणि पंचायत समितीसाठी चौदा गण करण्यात आले आहेत,
यावेळच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई गट आणि भाजपमध्ये गेलेल्या सत्यजित पाटणकर यांचा गट यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही गट राज्यातील सत्ताधारी महायुतीत असल्याने, दोन्हीकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. मात्र, आरक्षणाचे घोडे अडल्याने, सर्व जण त्याकडे नजरा लावून बसले आहेत.
पाटण तालुक्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि आता राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य पातळीवर आपला राजकीय ठसा उमटवला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी तालुक्यात गोकुळ तर्फ हेळवाक, मारुल हवेली, मल्हारपेठ, तारळे, म्हावशी, मंद्रुळकोळे, काळगाव हे जिल्हा परिषदेचे सात गट, तर पंचायत समितीसाठी गोकुळ तर्फ हेळवाक, कामरगाव, तारळे, मुरुड, म्हावशी, चाफळ, मल्हारपेठ, नाडे, मारुल हवेली, नाटोशी, कुंभारगाव, काळगाव, मंद्रुळकोळे, सणबूर हे १४ गण आहेत.
तालुक्याचा राजकीय इतिहास पाहता, पाटणकर गटाने जिल्हा परिषद व पंचायत समितीत देसाई गटावर अनेक वेळा थोड्याफार फरकाने मात करत सत्ता मिळवली आहे. गतवेळीही पंचायत समितीवर पाटणकर गटाची सत्ता होती. आता राजकीय चित्र बदलले आहे. शंभूराज देसाई यांनी मोठी मजल मारत, चार वेळा आमदारकी, तीन वेळा मंत्रिपद आणि दोन वेळा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवून पाटणकर गटाला मागे टाकून, तालुक्यात वर्चस्व निर्माण केले आहे.
पाटणकर गटाने अर्थात सत्यजित पाटणकर यांनी गत महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करून नवसंजीवनी मिळवली आहे. सातारा येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असे वक्तव्य केले होते.
त्यामुळे सावध झालेल्या पाटणकर गटाची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जास्त जागा मिळवण्यासाठी काय रणनीती असेल, हे लवकरच समजेल. शंभूराज देसाई गटाला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत यशाची खात्री आहे.
पाटणकर गटालाही विधानसभेचा पराभव, सोडून गेलेले पदाधिकारी, कार्यकर्ते व गावे या सर्वांवर मात करून, विजय खेचून आणावा लागेल, तरच आगामी कालावधीत पाटणकर गट उभारी घेईल. मात्र, पाचही बोटे तुपात असलेल्या देसाई गटाला मोठे यश मिळाले, तर पाटणकर गटाला आगामी राजकारण अवघड होईल. तालुक्याचे राजकीय वातावरण काही दिवसातच तापणार आहे.
गट आणि गणांमध्ये देसाई वरचढ
पाटण विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांचा पराभव करताना ३४ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. पंचायत समितीच्या गत निवडणुकीचा विचार करता, कोयना भागातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयना), म्हावशी गटातील चाफळ, तारळेतील मुरुड गण आणि ढेबेवाडी भागातील मंदुळकोळे, कुंभारगाव, सणबूर या पंचायत समिती गणांमध्ये पाटणकर गटाचे उमेदवार निवडून आले होते.
मात्र, आता या सर्व ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली पकड मजबूत केल्याचे आमदारकीच्या निवडणुकीत दिसले. मल्हारपेठ, नाडे, मारुल हवेली, नाटोशी, तारळे हे तर शंभूराज देसाई यांचे बालेकिल्ले आहेत.





