Nagar | कर्जत, मिरजगाव व खर्डा एसटी स्थानकाच्या अस्तरीकरणाचे भूमिपूजन

कर्जत/जामखेड, (प्रतिनिधी) – आमदार रोहित पवार यांनी कर्जत एसटी डेपोचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता कर्जत, मिरजगाव व खर्डा येथील बस स्थानकाचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे.
या कामाला यापूर्वीच मंजुमिळालेली आहे परंतु वर्क ऑर्डर निघण्यास काहीसा उशीर झाल्याने काम सुरू झाले नव्हते. री आता या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कर्जतच्या एसटी स्थानकाच्या अस्तरीकरणाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
मिरजगावचे भूमिपूजन डॉ.चंद्रकांत कोरडे, गुलाब तनपुरे आणि खर्ड्याचे भूमिपूजन विजयसिंह गोलेकर, श्रीकांत लोखंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हस्ते झाले.
गेल्या २०-२५ वर्षापासून कर्जतच्या एसटी डेपोचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत राजकारण्यांनी दिले.
परंतु निवडणूक झाली की हे आश्वासन फक्त आश्वासनच ठरत होते आणि राजकारण्यांनाही त्याचा विसर पडत होता. परंतु निवडून आल्यानंतर कर्जतच्या एसटी डेपोचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. त्यानुसार निवडून आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षांतच त्यांनी कर्जतच्या एसटी डेपोला मंजुरी आणली. त्यासाठी भरघोस निधी आणून सुसज्ज इमारत व व्यापारी संकुलाची उभारणीही केली.
आता या डेपोचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यानच्या काळात कर्जतसह जामखेडच्या एसटी डेपोसाठीही नवीन बस मिळाव्यात, यासाठीही आमदार रोहित पवार यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघ हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मतदारसंघातील कर्जत, मिरजगाव व खर्डा ही मोठी बाजारपेठ असलेली प्रमुख ठिकाणे आहेत. या चारही ठिकाणी कायम मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. परंतु पावसाळ्यात चिखल होऊन प्रवाशांचे हाल होतात. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, महिला यांना अधिक त्रास होतो.
त्यामुळे कर्जतच्या एसटी स्थानकासह मिरजगाव आणि खर्डा येथील एसटी स्थानकाचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या कामाला मंजुरी आणली होती. आता या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.





