Jamkhed News : पहिल्याच पावसात अमरधामकडून भुतवडा गावाकडे जाणार्या रस्त्याला मोठं भगदाड…!

जामखेड : जामखेड तालुक्यात व शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे नद्याना पूर आला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरातील अमरधामकडून भुतवडा गावाकडे जाणार्या रस्त्याला पुराचा फटका बसला असून मोठं भगदाड पडले आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या आंदाजनुसार दि 19 सप्टेंबरपासून जामखेड तालुक्यात व शहरात बेलगाम मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेती वाहून गेली आहे. तर अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. मोठ्या कष्टाने जपलेली शेती या पावसामुळे उभे पिकासहीत अक्षरशः वाहून गेली आहे.
तालुक्यातील खर्डा नान्नज जवळा साकत या परिसरातील गावांना मोठा फटका बसला आहे. शहरातील विंचरणा नदी इतक्या वर्षात सर्वात मोठ पूर आला असून मुसळधार पावसामुळे अमरधाम रोडवरील भुतवडा गावाकडे जाणारा रस्त्याला मोठं भगदाड पडले आहे. दोनच वर्षापूर्वी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते.
भगदाड पडल्यामुळे रस्त्यावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच मोठ्या पावसात रस्त्याला भगदाड पडल्याचे दिसून आले. शहरातील इतरत्रही सिमेंट रस्ते वाहुन गेले असून रस्त्याखालील खडी वर आल्याने रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. लवकरात लवकर नगरपरिषदेने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जामखेडकर करत आहे.





