Greg Chappell : ‘वैभवला योग्यरित्या हाताळला नाही, तर…’, चॅपेलने बीसीसीआयला दिला महत्त्वाचा इशारा

Greg Chappell warns Vaibhav Suryavanshi’s Talent Needs Careful Nurturing : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगताला दाखवून दिले की जर तुमच्याकडे प्रतिभा असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्याने फक्त ३५ चेंडूत शतक ठोकून सर्वांना आश्चर्यचकित केले. वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि जगभरातील दिग्गज त्याचे कौतुक करत आहेत. दरम्यान, माजी भारतीय प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी वैभवबद्दल बीसीसीआयला महत्त्वाचा इशारा दिला आहे.
सचिन-विनोदसह पृथ्वीचेही दिले उदाहरण –
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ यांची उदाहरणे देत ग्रेग चॅपेल म्हणाले की, ‘वैभवला योग्यरित्या हाताळले पाहिजे. अन्यथा, त्याचे करिअरही उद्ध्वस्त होऊ शकते. चॅपेल म्हणाले की, प्रतिभेला योग्य मार्गदर्शन आणि संरक्षण दिले पाहिजे. त्याचा फक्त मार्केटिंगसाठी वापर केला जाऊ नये. प्रत्येक पिढीमध्ये, एक ना एक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकत असतो. आजकाल आयपीएलमध्ये खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ मिळते. जिथे ते त्यांची प्रतिभा दाखवतात.’
वैभवबाबत बीसीसीआयलाही दिला इशारा –
वैभवने आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठोकले. इतक्या कमी वयात त्याने एक विक्रम केला आहे. ग्रेग चॅपेल यांनी त्यांच्या कॉलममध्ये लिहिताना, ‘बीसीसीआयला वैभवबद्दल काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. भारताने सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू पाहिला आहे. पण, मी विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ सारखे खेळाडू देखील पाहिले आहेत. ज्यांना त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर करता आला नाही.’
हेही वाचा – Shubman Gill : पंचांशी वाद घातल्यानंतर शुबमनने अभिषेकला मारली लाथ, VIDEO होतोय व्हायरल
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातील फरक –
चॅपेल यांनी लिहिले की, ‘सचिन तेंडुलकर किशोरावस्थेत यशस्वी झाला कारण त्याच्याकडे केवळ प्रतिभाच नव्हती तर एक मजबूत आधार प्रणाली देखील होती. त्याचा स्वभाव शांत होता. त्याचे प्रशिक्षक हुशार होते. त्याच्या कुटुंबाने त्याला सांसारिक गोष्टींपासून दूर ठेवले. दुसरीकडे, विनोद कांबळी देखील प्रतिभावान होता. कदाचित सचिनपेक्षा जास्त. पण, तो प्रसिद्धी आणि शिस्त यांच्यात संतुलन राखू शकला नाही. त्याचा उदय जितका जलद होता तितकाच त्याचे पतनही जलद होते. पृथ्वी शॉ हा देखील असाच एक खेळाडू आहे. ज्याचे नुकतेच पतन झाले आहे. पण, कदाचित तो पुन्हा स्वत:ला सावरु शकतो.’





