Grape Adulteration: द्राक्षांवर असलेले केमिकल कसे काढाल? घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा स्वच्छ
Grape Adulteration : केमिकल लावलेली द्राक्षे नीट स्वच्छ न करता खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वी ती योग्य पद्धतीने धुणे आणि स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही सोप्या घरगुती उपायांनी द्राक्षांवरील केमिकल्स मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.

Grape Adulteration: द्राक्षे हे अनेकांचे आवडते फळ आहे. विशेषतः मुलांना द्राक्षे खूप आवडतात. गोड आणि रसाळ असल्यामुळे बाजारात द्राक्षांना मोठी मागणी असते. मात्र सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक द्राक्षांवर कीटकनाशके आणि विविध प्रकारची केमिकल्स वापरली जात असल्याची भीती व्यक्त केली जाते. ही केमिकल्स द्राक्षे जास्त काळ ताजी राहावीत, त्यांना लवकर पक्वता यावी आणि त्यांचा रंग अधिक आकर्षक दिसावा यासाठी वापरली जातात.
तज्ज्ञांच्या मते, अशी केमिकल लावलेली द्राक्षे नीट स्वच्छ न करता खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वी ती योग्य पद्धतीने धुणे आणि स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही सोप्या घरगुती उपायांनी द्राक्षांवरील केमिकल्स मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.
द्राक्षांवर केमिकल्स का वापरतात?
द्राक्षांची शेती करताना अनेक ठिकाणी कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे कीड आणि रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. तसेच बाजारात विक्रीसाठी ठेवताना काही व्यापारी द्राक्षांवर प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स फवारतात. यामध्ये सल्फर डायऑक्साइडसारख्या पदार्थांचा समावेश असतो. काही वेळा द्राक्षांवर केमिकल वॅक्स लावली जाते, ज्यामुळे ती जास्त चमकदार दिसतात. ग्राहकांना अशी चमकदार द्राक्षे अधिक ताजी आणि चांगल्या दर्जाची वाटतात.
द्राक्षांवरील केमिकल्सचे नुकसान
अशा केमिकल्सने युक्त द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पोट फुगणे, गॅस होणे, अपचन होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोकांना अॅलर्जीचा त्रासही होऊ शकतो. याशिवाय दीर्घकाळ अशा पदार्थांचे सेवन केल्यास मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विशेषतः मुलांना द्राक्षे देताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Grapes
द्राक्षांवरील केमिकल्स कसे काढाल?
१. मीठ आणि व्हिनेगरचा उपाय
द्राक्षे स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि व्हिनेगरचा वापर करता येतो. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा व्हिनेगर मिसळा. त्यामध्ये द्राक्षे सुमारे दहा मिनिटे भिजत ठेवा. यामुळे द्राक्षांवरील अनेक केमिकल्स आणि कीटकनाशकांचा अंश कमी होण्यास मदत होते.
२. बेकिंग सोड्याचा वापर
द्राक्षांवरील घाण आणि केमिकल्स काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयोगी ठरतो. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडासा लिंबाचा रस टाका. त्यात काही वेळ द्राक्षे भिजत ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून खा.
३. कोमट पाण्याने धुणे
द्राक्षे स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणीही उपयोगी ठरते. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात द्राक्षे काही मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे द्राक्षांवरील काही प्रमाणातील कीटकनाशके आणि घाण निघून जाते.
तज्ज्ञांच्या मते, कोणतेही फळ खाण्यापूर्वी ते नीट धुणे ही सवय असणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः द्राक्षे, सफरचंद किंवा स्ट्रॉबेरीसारखी फळे थेट खाल्ली जात असल्यामुळे त्यांची स्वच्छता अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे साध्या घरगुती उपायांचा वापर करून द्राक्षे स्वच्छ केल्यास आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.





