श्री विघ्नहाराचा भव्य जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; ओझरमध्ये फुलांचा वर्षाव

ओझर : श्री विघ्नहार गणपतीच्या जन्मोत्सवाचा सोहळा बुधवारी दुपारी १२:३० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात साजरा झाला. फुलांचा वर्षाव, मोरया गोसावींची पदे आणि श्रींच्या नामघोषाने ओझरचा परिसर गणेशमय झाला. विघ्नहर मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजले होते. यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.
पहाटे ४:३० वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, विश्वस्त विनायक मांडे, संतोष कवडे, शिल्पा जगदाळे आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रींचा अभिषेक झाला. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी ७:३० वाजता तुषार कवडे, अनिकेत बोडके, दीपक गवळी, विलास कवडे आणि अमोल ढवळे यांनी महाआरती केली, ज्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारला.
सकाळी ९ ते १२ या वेळेत अंबेराई ओझर (जगदाळे मळा) येथे पृथ्वी-सूर्य पूजा आणि चौथा उत्तरद्वार सोहळा संपन्न झाला. श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल प्रसार्दिक भजन मंडळ यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. स्थानिकांनी फुलांची उधळण करत पालखीचे उत्साहात स्वागत केले. पालखी मंदिरात परतल्यानंतर पुजारी हेरंब जोशी, विघ्नराजेंद्र जोशी, जयेश जोशी आणि अमय मुंगळे यांनी मोरया गोसावींची पदे गायली.
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे (देहू) यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन झाले, त्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीमुळे मंदिराचा गाभारा, आवार आणि परिसर श्रींच्या नामघोषाने दुमदुमला.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, तसेच विश्वस्त प्रकाश मांडे, सूर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव आणि शिल्पा जगदाळे यांनी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करून गणेशोत्सवाची दमदार सुरुवात केली.


