शिरूर : शिरूर शहरातील कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत परवानगी शिवाय मशिनरी साहित्य ठेवणाऱ्या टोरंट गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर शिरूर नगरपरिषदेने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली. सदर प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. पाहणी दरम्यान कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या जागेत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टोरंट गॅस कंपनीने मशिनरी साहित्य ठेवले असल्याचे स्पष्ट झाले. टोरंट गॅस प्रा. लि. ही कंपनी सध्या शिरूर शहरात भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करत आहे. या कामासाठी खोदकामाची परवानगी नगरपरिषदेकडून मिळालेली असली, तरी मशिनरी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने ती न घेता थेट सरकारी जागेचा वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली. पालिकेने कंपनीला ४८ तासांच्या आत खुलासा देण्याची नोटीस दिली होती. मात्र, संबंधित वेळेत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने कठोर पावले उचलत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.