Gramin News : ‘जे एन मार्शल कंपनी’ विरोधात राष्ट्रीय हरित लवादची न्यायालयात याचिका दाखल

शिरुर : पुणे, चाकण औद्योगिक वसाहतीतील ‘जे एन मार्शल कंपनी’द्वारे प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केल्यानंतरही कंपनीविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
याविरोधात आता स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस यादव यांनी राष्ट्रीय हरित लवाद (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. तेजस यादव यांची याचिका स्वीकारण्यात आली असून पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चाकण एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये कार्यरत असलेल्या जे एन मार्शल कंपनीद्वारे हेक्झागाॅनल नट्स, कव्हर हब बोल्ट, स्टडस् आणि व्हील बोल्टचे उत्पादन घेतले जाते.
दरम्यान, सदरील कंपनीकडून उत्पादन घेत असताना पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करत तेजस यादव यांनी ॲड. रवि उईके, ॲड. गौरी कवडे आणि ॲड. शुभम गडदे यांच्यामार्फत कंपनीविरोधात एनजीटीत दावा दाखल केला आहे.
यादव यांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रदुषण नियंत्रण कायद्यांच्या उल्लंघन प्रकरणी कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामध्ये तक्रार दाखल केली आहे. मंडळाच्या स्थळ पाहणीमध्ये कंपनीकडून मार्च २०२३ पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडील वैध संमती न घेता कारखान्याकडून उत्पादन चालू असल्याचे समोर आले.
तसेच झीरो लिक्वीड डिस्चार्ज साध्य करणेसाठी कंपनीने अद्यावत यंत्रणा बसवलेली नाही. कारखान्यातून निघणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणेसाठी इफल्युयन्ट ट्रिटमेंट प्लॅन्ट कार्यान्वित नसल्याचे समोर आले. तसेच मोठ्या प्रमाणावर ऑईलची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच मंडळाच्या स्थळ पाहणीत कारखाना सुरु झाले पासून घातक कचऱ्याची विल्हेवाट लावली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तसेच प्लास्टिक कचरा, ऑईली ड्रम्पस् याची अशास्त्रीय पद्धतीने हताळणी व विल्हेवाट लावली जात असल्याचे समोर आले. याबाबत आवश्यक पूर्तता करण्याचे निर्देश एमपीसीबी ने दिले होते. याची पूर्तता झाली का नाही याची खात्री करण्यासाठी 10 जुलै रोजी एमपीसीबीच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी पुन्हा स्थळ पाहणी केली. या पाहणीत कंपनीकडून सदरच्या निर्देशांची पूर्तता केली नसल्याचे आढळून आले.
संबंधित कंपनीने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय या विभागाकडून कारखाना चालविण्यासाठी देण्यात येणारा वैध परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीविरोधात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पुणे तसेच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत आता एनजीटीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
प्रदुषण मंडळाच्या स्थळ पाहणीतील नमूद केलेल्या त्रुटींच्या आधारे एनजीटीने याचिका दाखल करुन घेतली आहे. याबाबत एनजीटीचे न्यायिक सदस्य जस्टिस दिनेश कुमार सिंह आणि तज्ञ सदस्य डाॅ. विजय कुलकर्णी यांनी एमपीसीबीसह औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाला म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
जे एन मार्शल कंपनीकडून पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. कारखाना सुरु झाल्यापासून कंपनीकडून घातक कचऱ्याचे विघटन केले गेले नाही. तर प्लास्टिक कचऱ्यासह अन्य अघातक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत एनजीटीमध्ये याचिका दाखल केली आहे.
– तेजस यादव, अध्यक्ष, स्वराज्य रक्षक प्रतिष्ठाण





