Gramin News: शिरुर-तांदळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

निमोणे – शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाट गावच्या हद्दित मंगळवार (दि. २७) रोजी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाला. सकाळी ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शिरुर वनविभागाला याबाबत माहिती दिली.
गुनाट-निर्वी गावच्या शिवेजवळ फंड वस्तीनजीक पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत पावल्याचे समजल्यानंतर मंगळवार (दि. २७) सकाळी ग्रामस्थांनी याठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर काही वेळात शिरुर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृत बिबट्याला वाहनातुन शिरुरच्या दिशेने नेण्यात आले. मृत बिबट्या अंदाजे ४ ते ५ वर्षे वयाची मादी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासुन या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे.
शेतकऱ्यांची जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. विशेषत: बकऱ्यांना बिबट्याने लक्ष केले होते. त्यामुळे गुनाट परीसरात घबराट पसरली होती.





