ग्रामपंचायत कराची होणार फेररचना

सातारा – ग्रामपंचायत अंतर्गत पुढील चार वर्षासाठी (2023-2027) कराची फेररचना एक एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कर रचनेत बदल होणार आहे. या फेररचनेमुळे काही प्रमाणात ग्रामपंचायत करांमध्ये वाढ होणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर कराची मागील फेररचना 2019 मध्ये करण्यात आली होती. मात्र, आता नव्याने एक एप्रिल 2023 पासून होणारी 2026-27 या कालावधीपर्यंत नवीन कर रचना सुरु राहणार आहे. या फेर रचनेत मागील वर्षात जुन्या इमारतीच्या बांधकामामध्ये झालेले बदल, जुन्या इमारती पाडून त्या जागेवर नव्याने बांधकामे होऊनही ते विचारात न घेता 8 अच्या उतार्यावर जुन्या नोंदी तशाच कायम ठेवण्यात येतात.
तर, केवळ नव्या जागेवर नव्याने झालेल्या बांधकामांचा विचार करुन तेवढीच कर आकारणी करण्यात येते. मात्र, नव्याने होणार्या कर आकारणी फेर रचनेत घरांची मोजमापे घेऊन कर आकारणी लागू होणार आहे. त्यामुळे जुन्या ईमारतींमध्ये बांधकाम होऊनही नोंदी झालेल्या नसतील तर आता त्या नोंदी होत घरांची नव्याने कर आकारणी केली जाणार आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर कर आकारणीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कर आकारणीची रचना करताना कमाल आणि किमान दर निश्चित करुन देण्यात आले आहेत. कच्ची ईमारत, आरसीसी इमारत, मातीची ईमारत यासारख्या विविध प्रकारांच्या नोंदी असतात. यामध्ये आकारणी करताना कमाल दराच्या खाली व किमान दरापेक्षा अधिक आकारणी केली जात नाही. आता नव्याने होणाऱ्या फेर आकारणी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. ज्या ठिकाणी बदल झाले आहेत त्या ठिकाणी नव्या दराने आकारणी केली जाणार आहे. तसेच गावोगावी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना कर आकारणीची बिले देऊन वसूली करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. बांधकामांच्या नोंदीचीही कार्यवाही अंतिम टप्यात आली आहे.
जुन्या इमारतीत नव्याने बांधकाम होऊनही त्याच्या नोंदी न झाल्याने कर आकारणी झालेली नसते. मात्र, दर चार वर्षांनी होणाऱ्या फेर रचनेत नव्या नोंदी करण्याची संधी ग्रामपंचायतींना असते. त्यामुळे नव्याने नोंदी करुन फेर रचनेत ग्रामपंचायतीच्या उत्पनात वाढ होत तिजोरीत भर पडणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर नवीन कर अकारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी





