Gram Panchayat Results 2021 | जावळीतील कुडाळमध्ये त्रिशंकू स्थिती; तालुक्यात अनेक अटीतटीच्या लढती

पाचगणी ( Gram Panchayat Results 2021 ) – जावळी तालुक्यात 74 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 37 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 37 ग्रामपंचायतींमध्ये काही ठिकाणी एक-दोन जागांसाठी, तर काही ठिकाणी तीन-चार जागांसाठी निवडणूक झाली.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीत कोणालाही बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. खामकरवाडीत 76 वर्षांच्या आजीबाईंनी एकाकी लढत देऊन फक्त एका मताने विजय मिळवला आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या हुमगावात भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ यांच्या गटाने बाजी मारली आहे.
मेढ्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. तहसीलदार मनीषा आव्हाळे, राजेंद्र पोळ यांनी मतमोजणीसाठी उत्तम नियोजन केले होते. ज्या गावाची मतमोजणी आहे, तेथील उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनाच आत सोडले जात होते. मतमोजणीसाठी 24 टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण सात फेऱ्यांमध्ये 11 वाजेपर्यंत सर्व 37 ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण झाली.
त्यातील 115 जागांसाठी 242 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कुडाळ, सर्जापूर, सरताळे, बामणोली, पवारवाडी, महिगाव, बेलावडे, रायगाव, सायगाव, भिवडी, कोलेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या.
कुडाळ ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनेल होती; परंतु कोणालाही बहुमताचा आकडा पार करता आला नाही. रयत पॅनेलला सात, बहुजन पॅनेलला चार आणि समर्थ पॅनेलला चार जागा मिळाल्या आहेत. दीपक पवार यांच्या पवारवाडीत पाचही जागांवर त्यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला. केवळ दोन बिनविरोध जागा त्यांना मिळाल्या आहेत.





